अहमदनगर/संगमनेर/राहुरी/पाथर्डी/शेवगाव |प्रतिनिधी| Ahmednagar

आधीच करोनामुळे बेजार झालेल्या जनतेला आणि शेतकर्यांना आता अवकाळी आणि गारपिटीचा जबर फटका बसला आहे.

संगमनेर, राहुरी, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांत झालेल्या जोरदार गारपिटीमुळे उभ्या पिकांसह कांदा, भाजीपाला, टरबूज, मोसंबी, आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले. कोबी, फ्लॉवर, कोथंबीर, टोमॅटो, वांगी अशा भाज्यांचा शेतात अक्षरशः चिखल झाला. पाथर्डी तालुक्यात डांगेवाडी परिसरातील सुमारे 25 किलो मीटरच्या रस्त्यावर गारांचा थर साचला होता. दरम्यान, डोळ्यांदेखत पिकांचे होणारे नुकसान पाहून अनेक शेतकर्यांचे डोळे पाणावले होते.

राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाचे झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील देवळाली प्रवरात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह वादळी वार्याने परिसराला दणका दिला.

अचानक आलेल्या पावसाने आठवडे बाजारची दाणादाण उडवून दिली. वादळी वार्याने शेतात उभी असलेली व काढणीस आलेली गव्हाची पिके तसेच घास पिके भुईसपाट झाली. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा व मका ही पिके उभी आहेत. तर गहू, हरभरा या पिकासह काही ठिकाणी कांदा पिकाची काढणी सुरू आहे. अवकाळी पावसाने यामध्ये व्यत्यय आणला असून काही ठिकाणी मळणी सुरू असल्याने शेतमाल भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला. गावच्या आठवडे बाजाराची वादळी पावसाने दाणादाण उडवून दिल्याने बाजारकरुंचे हाल झाले.

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील आरडगाव तसेच पूर्व भागातील कोंढवड येथे अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीने जबर तडाखा दिल्याने गहू, उस, कांदा ही पिके भुईसपाट झाली. काल दिवसभर वातावरणात दमटपणा होता. देसवंडी, कोंढवड, शिलेगाव, तांदुळवाडी, आरडगाव या भागात दुपारी 4 वाजता वादळी वार्याला सुरूवात झाली. सुमारे एक तास या वार्याने धुमाकूळ घातला. काढणीस आलेला गहू, कांदा, ऊसासारखी पिके जमिनदोस्त झाली. काढलेला कांदा व गहू या अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने विज पुरवठा खंडीत झाला.

तालुक्याच्या पश्चिम भागात बारागाव नांदुरसह परिसरातील गावातील कांदा, गहू, ऊस, टरबूज, काकडीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने त्वरित नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. म्हैसगाव, ताहाराबाद, मल्हारवाडी, घोरपडवाडी, कुरणवाडी, चिंचाळे, दरडगाव, वावरथ, जांभळी परिसरातील काढणीसाठी आलेले कांदा पिक भुईसपाट झाले. वार्यामुळे गहु जमिनदोस्त झाला. काही ठिकाणी टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले.

गारांमुळे ऊसाच्या पानांच्या चिंधड्या झाल्या. अवकाळी पावसाच्या संकटामुळे राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. यावर्षी पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी कांदा, गहू, टरबूज, ऊस सह इतर पिके घेतली होती. परंतु निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण शेती पिकांचे मोठे नुकसान केले. शेतकर्यांचे लाखो रुपये वाया गेले. नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. मोठ्या कष्टाने कांदे, टोमॅटो लागवड केली परंतू शेवटी निराशाच पदरी पडली, असे बाळासाहेब नानाभाऊ गाडे यांनी म्हटले.

तर परिस्थितीशी दोन हात करत रमजान महिन्यात चांगला भाव मिळेल या आशेने टरबूज लागवड केली. परंतू निसर्गाने संपूर्ण हिरावून नेल्याची खंत सिकंदर इनामदार यांनी व्यक्त केली. तोंडाशी आलेला घास गेला, अशी प्रतिक्रीया शिवाजीराव पवार यांनी नोंदविली.

पाथर्डी तालुक्यातील

कासार पिंपळगाव, ढवळेवाडी, चितळी, पाडळी, हात्राळ, सैदापुर, साकेगाव, डांगेवाडी, खेर्डे, सांगवी, पागोरी पिंपळगाव, दुलेचांदगाव, माळेगाव, कोरडगाव, अकोला, मोहज देवढे, पालवेवाडी या परिसरात जोरदार वादळ व गारपीटीने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. पाथर्डी शहराजवळील अमरधामसमोर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठे झाड कोसळुन पत्र्याचे शेडचे नुकसान झाले. रस्त्याने चाललेल्या ट्रॅक्टरवर झाड पडले. सुदैवाने चालक वाचला. कडब्याची गंजी, पत्रे पतंगासारखे उडत होते. वीज वाहक तारा तुटुन वीजपुरवठा खंडित झाला.

तालुक्यात सध्या सुगीचा हंगाम सुरू असून गहु, हरबरा, ज्वारी या पिकांची काढणी व खळे अशी कामे सुरू आहेत. कांदा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याची पात गारपीटीने तुटली. भाजी पाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. फळबागांत होत्याचे नव्हते झाले. मोसंबी, आंबा बागांचे सर्वाधिक नुकसान झाले. अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच गावरान व संकरित आंबे मोठ्या प्रमाणावर बहरले होते. आंब्याचे विक्रमी पीक येणार असे वाटत असतांना शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कोबी, फ्लॉवर, कोथंबीर, टोमॅटो, वांगी अशा भाज्यांचा शेतात अक्षरशः चिखल झाला. सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी गावोगावच्या आपदग्रस्त शेतकर्यांवर मरण यातना भोगण्याची वेळ आली आहे. डांगेवाडी व परिसरातील सुमारे 25 किलो मीटरपर्यंतचा पुर्व पश्चिम डांबरी रस्ता गारपीटीने कापसाने अच्छादल्यासारखा दिसत होता. अशोक एकशिंगे, रघुनाथ सातपुते, अशोक सातपुते या शेतकर्यांसह हनुमान नगर परिसरात भुईमुग व उसाचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्यांनी गहु, ज्वारीची पिके काढुन त्यांची खळे करण्यासाठी गंजी लावुन ठेवल्या त्या वादळामध्ये दिसेनाशा झाल्या.

संगमनेर तालुक्यातील

पुर्व व पठार भागाकडील असणार्या खांबे गावाला मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीसह पावसाने झोडपल्याने पिकांचे मोठे नूकसान झाले आहे, असे आश्वी व साकुर येथील वार्ताहरांनी कळविले आहे. साकुर पठार भागातील शेंडेवाडी, सतीची वाडी, कौठे मलकापूर येथेही वादळी वार्यासह गारपीट झाली.

गहु, हरभरा सोंगणीचे दिवस आहेत. पावसाचा अंदाज नसतानाही पावसाने गारपिटीसह हजेरी लावल्याने खांबे, म्हैसगाव मधील शेतीमालासह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साडे पाचच्या दरम्यान पिंपळगाव देपा, मांडवे, चिखलठाण, वरवंडी आदिसह पठार व पुर्व भागात पावसाने हजेरी लावून शेतकर्यांची धांदल उडून दिली. काही ठिकाणी गारांचे प्रमाण कमी होते. मात्र खांबे, म्हैसगावला जबर फटका बसला. गारपीटीने कांदा, गहु, हरभरा, मका, ऊस, डाळींब आदि पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. खांबे, म्हैसगाव परिसराला गारपीटीसह पावसामुळे झालेल्या शेती मालाचे नुकसानाच शासनाने त्वरीत पंचनामे करुन शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खांबेचे संरपच रविंद्र दातीर यांनी केली आहे.

साकूर वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागात शनिवारी 4 वाजेच्या सुमारास ढग जमा होऊन साकुर जवळील शेंडेवाडी सतीची वाडी वैतागवाडी व कौठे मलकापूर परिसरात वादळी वार्यासह गारांचा पाऊस पडला. शेंडेवाडी व सतीची वाडी या परिसरात चांगल्या प्रकारे गारांचा पाऊस झाला तर कौठेमलकापूर या परिसरात तुरळक गारांचा पाऊस पड या गारांच्या पावसाने शेतातील पिकांचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.

शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी गारांचा पाऊस पडेल या भीतीने चिंतेत होता मात्र सर्व ठिकाणी हा पाऊस झाला नाही सध्या हे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच शेतीमालाला बाजार भाव नाही शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यात ही नैसर्गिक आपत्ती या भीतीने शेतकरी तर चांगलाच धास्तावला आहे.

कोरडगाव येथील

वार्ताहारच्या वृत्तानूसार सायंकाळी पाचच्या सुमारास प्रचंड प्रमाणात वादळीवार्यासह गारपीटीने झोडपून निघाला. यामध्ये शेतीतील पिकांचे मोठयाप्रमाणात नुकसाण झाले आहे.तोंडाशी आलेले पिकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. परिसारातील गावांना गारपिठीचा तडाखा बसला. गारांच्या मार्यामुळे झाडांच्या खाली कैर्यांचे ढिग लागले होते. वर्षभराच्या बहाराचे काही उपयोग झाला नाही. त्याच प्रमाणे गहु, हरबरा, सुर्यफुल मका, कांदा, कोबी आदी पिके मोठया प्रमाणात नुकसान झाले.

शेवगाव तालुक्यातील

बोधेगाव येथील वार्ताहराच्या वृत्तानूसार तालुक्यासह पूर्व भागातील लाडजळगाव गोळेगाव, शेकटे बोधेगाव व आणि पंचक्रोशीत वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. जोरदार पर्जंन्यवृष्टी सुरु असतानाच प्रचंड गारांचा वर्षाव झाला. क्षणार्धात सर्व परिसर पांढरा शुभ्र गारमय झाला होता.सगळीकडे पाणीच पाणी झाले. या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अचानक आस्मानी संकट कोसाळल्याने आणि हाती आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. शेतातील काढणीला आलेला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व पिके भूईसपाट झाली. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करुन सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी लाडजळगाव येथील प्रगतशिल शेतकरी भागवतराव तहकिक यांनी केली आहे. शेतकर्यांनी नियोजनपूर्वक मशागती करुन हे पिक आणली होती. परंतु अचानक झालेल्या गारपीटीमुळे सर्व पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ सर्व पिकांचे पंचनामे करुन मदत करावी, अशी मागणी कोरडगाव येथील प्रगतशिल शेतकरी संगिता जोशी यांनी केली आहे.

नगर शहरात

सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या जारेदार सरी बरसल्या. तसेच तालुक्यातील निंबोडी, सारोळा बद्दी परिसारात गारांंचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रात्री उशीरा नगर शहरात ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला होता.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अचानक आलेल्या तीव्र स्वरूपाचे वादळ गारपीट व पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तीव्रता पाहता महसुल व जिल्हा परिषद प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- आ. मोनिकाताई राजळे