गावोगावच्या उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद, आता निकालाची उत्सुकता

गावोगावच्या उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद, आता निकालाची उत्सुकता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत सुमारे 82 टक्के मतदान झाले. यात 2 लाख 25 हजार 301 महिला मतदार आणि 2 लाख 36 हजार 78 पुरूष मतदार अशा एकूण 4 लाख 61 हजार 381 मतदारांपैकी 3 लाख 77 हजार 436 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान हे कर्जत तालुक्यात 89.55 टक्के तर सर्वात कमी मतदान पाथर्डी तालुक्यात 79.28 टक्के इतके झाले. काल झालेल्या मतदानाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यात कोणत्याच भागात वादविवाद न होता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. गावोगावच्या उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले असून आता उत्सुकता निकालाची आहे.

जिल्ह्यात मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत 13 ग्रामपंचायती आणि 15 सरपंच पदाच्या जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 195 ग्रामपंचायत आणि 188 सरपंच पदांच्या जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. रविवारी सकाळी जिल्ह्यातील 14 तालुक्यात सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.

पहिल्या दोन तासांत म्हणजेच 11.30 पर्यंत 30.53 टक्के मतदान झाले होते. 76 हजार 955 पुरूष आणि 63 हजार 893 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाची आकडेवारी ही 54.19 टक्क्यांवर पोहचली. यावेळी 1 लाख 34 हजार 414 पुरुष आणि 1 लाख 15 हजार 595 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी 3.30 पर्यंत मतदानाची आकडेवारी ही 69.42 टक्के झाली होती. यात 1 लाख 65 हजार 741 पुरुष आणि 1 लाख 54 हजार 559 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर सायंकाळी 5.30 पर्यंत ऐवढे टक्के मतदान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात काल मतदाना दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणीचे काही प्रकार घडले असले तरी त्याचा मतदानावर परिणाम झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उद्या मतमोजणी

उद्या मंगळवारी 14 तालुक्याच्या ठिकाणी तहसीलच्या आवारात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी कोणाला कौल दिला हे समोर येणार आहे. यंदापासून सरपंचपदावरील निवड ही जनतेतून होणार असल्याने अनेक ठिकाणी बहुमत एका बाजूला आणि सरपंच दुसर्‍याच पक्षाचा निवडूण येणार असल्याची शक्यता अधिक असल्याने भविष्यात ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत प्रश्न राहणार आहे.

- राहाता : साकुरीत नववधूने बजावला हक्क

- खंडाळ्यात मतदान खेचून आणण्यासाठी दोन्ही गटांची प्रयत्नांची पराकाष्टा

- राहुरी : ताहराबादमध्ये 8 वाजेपर्यंत मतदान

- नेवाशातील हिंगोणीत अवघे 24 टक्के मतदान

- संगमनेर : थोरात-विखे गटांची प्रतिष्ठा पणाला

- काष्टीत पाचपुते यांच्या चुलत बंधूच्या

- लढतीकडे सर्वांच्या नजरा

- जामखेडमध्ये आ. रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदेंच्या गटात लढती

- कोपरगाव : मतदान खेचण्यासाठी काळे-कोल्हे गटात जोरदार रस्सीखेच

तालुकानिहाय मतदान असे

अकोले 9 हजार 344 (79.66), संगमनेर 78 हजार 918 (80.53 टक्के), कोपरगाव 45 हजार 528 (79.44), श्रीरामपूर 7 हजार 971 (79.30), राहाता 25 हजार 173 (81.3), राहुरी 23 हजार 141 (81.44), नेवासा 19 हजार 843 (80.16), नगर 44 हजार 700 (84.44), पारनेर 34 हजार 206 (86.21), पाथर्डी 21 हजार 106 (79.26), शेवगाव 19 हजार 983 (79.43), कर्जत 13 हजार 512 (89.55), जामखेड 5 हजार 638 (83.53) आणि श्रीगोंदा 28 हजार 400 (82.61) एकूण झालेले मतदान 3 लाख 77 हजार 436 आणि त्याची टक्केवारी 81.77 टक्के आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com