जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर

जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार गुरूवारी (दि. 13) प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्यास मुदत आहे, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. संगमनेर 38, नगर 28, कोपरगाव 26, पारनेर 16, नेवासे 13, शेवगाव 12, राहाता 12, पाथर्डी 11, राहुरी 11, श्रीगोंदे 10, अकोले 10, कर्जत 8, श्रीरामपूर 6, जामखेड 3 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. मतदार यादी तयार करण्यासाठी 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरली आहे.

205 ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 13 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. ग्रामपंचायत, तलाठी, मंडलाधिकारी, पंचायत समिती व तहसील कार्यालयांच्या फलकावर ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ता. 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. उपलब्ध होणार्‍या हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी ता.21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या आहेत महत्वाच्या ग्रामपंचायती

नेवासे तालुक्यातील माका, खुपटी, भेंडा खुर्द, वडाळा बहिरोबा, कांगोणी. अकोले तालुक्यातील भंडारदरा, चास. जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नपूर. नगर तालुक्यातील कापूरवाडी, वाळकी, नेप्ती, नांदगाव. राहाता तालुक्यातील साकुरी, सावळी विहिर बुद्रूक, नांदुर्खी. पारनेर तालुक्यातील भाळवणी, ढवळपुरी, पळशी, गोरेगाव. राहुरी तालुक्यातील सोनगाव, कोल्हार खुर्द. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी, बनपिंप्री, बेलवंडी. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर, खंडाळा. शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, अमरापूर. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, भालगाव, कोल्हार. संगमनेर तालुक्यातील जोर्वे, साकूर, तळेगाव दिघे, धांदरफळ खुर्द व बुद्रूक. कर्जत तालुक्यातील कोपर्डी, कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख, चांदेकसारे, चासनळी आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com