जिल्ह्यात ‘गोवंश गोपालक उन्नती’ अभियानाला सुरूवात

पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा व दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न: पशुखाद्य, औषधे खरेदीसाठी क्रेडिट कार्ड
जिल्ह्यात ‘गोवंश गोपालक उन्नती’ अभियानाला सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हात आजपासून ‘गोवंश गोपालक उन्नती’ अभियानास सुरूवात झाली असून फेब्रुवारी 2023 पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या या अभियानामध्ये पशुवैद्यकीय सेवांचा गुणात्मक दर्जा सुधारणे व जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ व्हावी, हा उद्देश आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी दिली.

जिल्ह्यात कार्यरत पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाने या अभियानाची आजपासून सुरूवात होणार आहे. मे महिन्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींचा आढावा घेऊन आवश्यक ठिकाणी पशुसंवर्धन विभागास उपलब्ध असलेल्या बांधकाम निधीतून दुरूस्ती कामे व सुशोभीकरण आराखडा तयार करण्यात येईल. जून महिन्यात वैरण विकास विषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल.

जूलै ते नोव्हेंबर या चार महिन्यांत वंध्यत्व निर्मूलन शिबिरे, सुप्तावस्थेतील स्तनदाह रोगनिदान व उपचार हा कार्यक्रम राबविण्यात येईल. डिसेंबर महिन्यात अकोले तालुक्यातील राजुर येथे उत्कृष्ट डांगी जनावरांचे प्रदर्शन घेण्यात येणार आहे. जानेवारी 2023 या महिन्यात आदर्श गोपालक पुरस्कार व आदर्श पशुवैद्यकीय दवाखाना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून फेब्रुवारी 2023 या महिन्यात या अभियानाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

जिल्हा हा पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये महाराष्ट्रात अग्रेसर आहे. राज्यातील सर्वात जास्त 16 लाख गोवंशीय पशुधन जिल्ह्यात असून दैनंदिन 29 लाख लीटर दूधाचे उत्पादन घेतले जाते. जिल्हा परिषदेच्या 216 पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत जिल्ह्यात पशुवैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून गोपालकांना पशुखाद्य व आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वितरित करण्यासाठी 18 एप्रिल ते 31 जूलै 2022 या कालावधीत विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट गोपालकांची निवड करून त्यांना ‘आदर्श गोपालक पुरस्कार’ देण्यात येईल. तसेच तालुकानिहाय उत्कृष्ट कामकाज असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे. गोवंश गोपालक उन्नती अभियान 2022-23 राबवताना जिल्ह्यातील सर्व पशुपालन क्षेत्रातील तज्ज्ञ व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेतले जाईल. जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकर्‍यांनी या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com