
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील घरकुलांच्या कामांना गती देण्यासाठी 20 नोव्हेंबरपासून महाआवास योजनेत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात टप्पे ठरवून त्या टप्प्यावर घरकुलांची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेने या अभियानात गगनभरारी घेतली आहे. गेल्या 56 दिवसांत रात्रंदिन प्रयत्न करून 5 हजार घरकुलांचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यात विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात राज्यात पहिल्या स्थानावरून त्या खालोखाल पहिल्या पाचमध्ये धुळे दुसर्या, नाशिक तिसर्या, जळगाव चौथ्या तर यवतमाळ हे पाचव्या स्थानावर आहे.
जिल्ह्यात घरकुल योजनेला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ग्रामपंचायत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सोबत 22 नोव्हेंबरपासून घरकुलाच्या कामाला गती नव्हे महागती दिली आहे. याचाच परिपाक म्हणून नगर जिल्ह्यात 56 दिवसांत पाच हजार 22 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्य वर्षी नगर जिल्हा परिषदेला महाआवास अभियानांतर्गत दहा पेक्षा अधिक पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी देखील घरकुलांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले होते. नगर जिल्ह्याला 2016-17 ते 2021-22 या कालावधीत 61 हजार 584 उद्दिष्ट आहे. यापैकी 61455 घरकुले मंजूर आहेत. नगरसह राज्यात मंजूर मात्र सुरू न झालेली आणि सुरू झालेली पण पूर्ण न झालेल्या घरकुलांसाठी 100 दिवसाचे अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान 22 नोव्हेंबरला सुरू झाले असून 31 मार्चअखेर अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. मात्र, नगर जिल्ह्यात हे काम फेबु्रवारी अखेर पूर्ण करण्याचा निश्चित जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे केला आहे.जिल्ह्यात अभियान काळात 18 हजार 432 घरकुलांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
अशा प्रकारे टीमवर्क
घरकुलांच्या कामे पूर्ण करण्यासाठी गेल्या आठवड्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दररोज दोन तालुक्याची ऑनलाईन बैठक घेवून आढावा घेतला. त्याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी प्रत्येक तालुक्यात महिन्यांतून दोनदा भेटी देवून प्रत्यक्षात सुरू न झालेली आणि सुरू असणार्या कामांचा आढावा घेतला. तसेच त्यांच्यासोबत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे शाखा अभियंता किरण साळवे यांच्यासह प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी आणि त्यात्या गावातील ग्रामसेवक यांनी घरकुलांच्या विषयात रस दाखवत महाआवास योजनेत राज्यात आघाडी घेतली आहे.
असे आहे अनुदान
घरकुल मंजूर झाल्यावर टप्प्यानूसार संबंधीत लाभार्थी यांना घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजारांचे अनुदान मिळते. तसेच संपूर्ण स्वच्छता अभियानातून 12 हजार तर रोजगार हमी योजनेतून 23 हजार 500 रुपयांचे अनुदान मिळते. अशा प्रकारे एका घरकुलासाठी दीड लाखांपेक्षा अधिक निधी मिळतो.
तालुकानिहाय घरकुलांचे बांधकाम
अकोले 620, जामखेड 710, कर्जत 585, कोपरगाव 236, नगर 152, नेवासा 625, पारनेर 124, पाथर्डी 483, राहाता 290, संगमनेर 350, शेवगाव 292, श्रीगोंदा 211 आणि श्रीरामपूर 188 असे 5 हजार 22 घरकुलांची कामे 56 दिवसात पूर्ण करण्यात आलेली आहेत.