
अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सर्तक झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरासह जिल्ह्यात एक हजार 300 पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय तीन आरसीपी तुकड्या, एसआरपीएफची एक कंपनी, सहा स्ट्रायकिंग फोर्स, दोन क्युआरटी व 400 होमगार्ड बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहे.
अहमदनगर शहर व जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, 15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे, 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती व 17 एप्रिल रोजी ईस्टर संडे हे सण- उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात 249 ठिकाणी प्रतिमा पुजन, 53 ठिकाणी पुतळा पुजन, 243 ठिकाणी मिरवणुक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक- 2, पोलीस उपअधीक्षक- 7, पोलीस निरीक्षक- 29, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक- 70, पोलीस अंमलदार- 1250, होमगार्ड- 400, आरसीपी- 3, एसआरपीएफ- 1, स्ट्रायकिंग फोर्स- 6, क्युआरटी- 1 अशा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात विशेषत : अहमदनगर शहर, श्रीरामपूर शहर, संगमनेर शहर, नेवासा, राहुरी, जामखेड आणि नगर तालुका या संवेदनशिल तालुक्यात अधिकचा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांचा बंदोबस्त देण्यात आला आहे.