नगर जिल्ह्यासाठी आठवडाभरात साडेसात हजार टन खत उपलब्ध होणार

ना. गडाख : नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना बफर स्टॉकमधून मिळणार 484 टन युरिया
नगर जिल्ह्यासाठी आठवडाभरात साडेसात हजार टन खत उपलब्ध होणार

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी साडेसात हजार मेट्रिक टन खत उपलब्ध होणार असून नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना युरिया खताची टंचाई भासू नये यासाठी 484 टन युरिया खत उपलब्ध केले जाणार आहे. याबाबत काल बुधवारी राज्याचे जलसंधारणमंत्री ना. शंकराव गडाख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. त्यावेळी खत उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन व ऊस पिकासह इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे म्हणून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांनी काल (बुधवारी) नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून नेवासा तालुक्यास पुरवठा करण्यात आलेल्या एकूण खतामधून जो 691 मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक केलेला आहे त्यातील 70 टक्के म्हणजे 483.70 मेट्रिक टन युरीया खत शेतकर्‍यांची खरीप हंगामातील पिकासाठी असलेली मागणी विचारात घेऊन तालुक्यातील परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यामुळे नेवासा तालुक्यासाठी 483.70 मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

सदरचे खत तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या गावाजवळील अधीकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रामधून घेऊन जावे असे आवाहन नामदार गडाख यांनी केले आहे.

कृषिमंत्री ना. दादाजी भुसे व ना. शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा तालुक्यासाठी आत्तापर्यंत पुरवठा झालेल्या 2076 मेट्रिक टन युरिया खतापैकी तालुक्यात युरीया खताची मोठी टंचाई असताना मुळा बाजार मार्फत सोनई व नेवासा येथून 130 मेट्रिक टन युरीया खताची 939 शेतकर्‍यांना विक्री करण्यात आली.

मुळा बाजारमार्फत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना युरीया खत मिळावे म्हणून प्रत्येक शेतकर्‍यास तीन गोण्या खत आधार कार्ड लिंक करून व प्रति गोणी 266 रुपये दराप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आले. आता खताच्या बफर स्टॉकमधून ना. गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना 483.70 मे. टन युरीया अधिकृत परवानाधारक खत दुकानदारामार्फत उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा

जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन नामदार शंकरराव गडाख यांनी काल बुधवारी आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा खताचा प्रश्न सुटणार असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com