323 गावांमध्ये एकच गणराय विराजमान

‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला प्रतिसाद
323 गावांमध्ये एकच गणराय विराजमान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गावांमध्ये एकोपा राहण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आली. त्यात एकच गणपती बसवून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या योजनेत यंदा जिल्ह्यातील 323 गावांमध्ये एकच गणराय विराजमान झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यातील अकोले व राजूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 112 गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

अकोले तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सव काळात गावात गट-तट निर्माण होऊन वाद होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येते. पोलीस ठाण्यामार्फत हद्दीतील गावांमध्ये बैठक घेऊन, या योजनेसंदर्भात प्रबोधन करण्यात येते; परंतु अलीकडच्या काही वर्षांपासून ही संकल्पना मागे पडू लागल्याने गावांची संख्या कमी होऊ लागली आहे.

यंदा 32 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यंदाही अकोले तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अकोले व राजूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 112 गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या तालुक्यांत राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 72 व अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत 40 गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली. पारनेर तालुक्यात पारनेर व सुपा पोलीस ठाणे हद्दीतील 38 गावात, संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाणे हद्दीतील 36 गावामध्ये ही संकल्पना राबविण्यात आली. शेवगाव तालुक्यात केवळ एका गावात एक गणपती बसविण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यात या संकल्पनेला प्रतिसाद मिळाला नाही. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमध्ये या संकल्पनेला प्रतिसाद मिळत नाही. त्या तुलनेत एक हजार, दोन हजार अशी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ही संकल्पना बळ धरते.

पोलीस ठाणेनिहाय गावे

पारनेर 23, सुपा 15, नगर तालुका 16, एमआयडीसी 2, श्रीगोंदा 13, बेलवंडी 10, जामखेड 18, शेवगाव 1, पाथर्डी 5, नेवासा 10, शनिशिंगणापूर 1, सोनई 2, शिर्डी 2, राहाता 5, लोणी 3, कोपरगाव तालुका 3, कोपरगाव शहर 2, राहुरी 18, श्रीरामपूर शहर 4, श्रीरामपूर तालुका 4, संगमनेर शहर 10, संगमनेर 26, राजुर 72, अकोले 40, घारगाव 14, आश्‍वी 03.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com