जिल्ह्यातील धरणातील वाचा पाणीसाठा !

मुळा धरणातील साठा आज 10 हजार दलघफू होणार || शिरपुंजे, पाडोशी, सांगवी ओव्हरफ्लो || घाटघर, रतनवाडीत 9 तर भंडारदरात 8 इंच पाऊस
रंधा फॉल
रंधा फॉल

निळवंडे 50 टक्के भरले !

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात पावसाची जोरदार बँटींग सुरू असल्याने उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणात जोरकस आवक होत असून निळवंडे धरणातील पाणीसाठा निम्म्यावर पोहचला आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल रविवारी सायंकाळी 4138 दलघफू (49.73टक्के) झाला होता. त्यानंतर रात्री या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या पुढे सरकला होता. तर 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 4847 दलघफू(44 टक्के) झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आज उद्या हे धरणही दोन दिवसांत निम्मे भरण्याची शक्यता आहे.

पाणलोटात सहाव्या दिवशी धो-धो पाऊस सुरू असल्याने गत 24 तासांत निळवंडे धरणात 417 दलघफू तर भंडारदरार 760 नव्याने दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे निळवंडेतील पाणीसाठा 4138 (49.73टक्के) झाला होता. त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धरणातील पाणीसाठा निम्मा झाला होता. भंडारदरात काल दिवसभर पडणार्‍या पावसाची नोंद 22 मिमी झाली आहे. अकोले तालुक्यातील कृष्णावंती नदीवरील लघु पाटबंधारे तलाव वाकी काल शनिवारी दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाल्याने निळवंडे धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. वाकीतून 789 क्युसेकने तसेच अन्य ओढे नाले भरभरून वाहत असल्याने तासागणिक या धरणातील पाणीसाठा वाढत आहे. धो धो पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले असून जनजीवन पुरते गारठून गेले आहे.

पावसाने जोर पकडल्याने डोंगर दर्‍यांमधून वाहणारे धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. ओढेनानाल्यांना पूर आला असून धरणात विसावर आहे. त्यामुळे धरणाचे खाली गेलेले पोट आता फुगू लागले आहे.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

भंडारदरा - 209, घाटघर - 230, पांजरे - 00, रतनवाडी- 229, वाकी - 167

गोदावरी नदीतील विसर्ग 11000 क्युसेक होणार, गंगापूर निम्मे भरण्याच्या मार्गावर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणाच्या पाणलोटातील मुसळधार पावसाने दारणाचा साठा 60.25 टक्क्यांवर पोहचला आहे. पाणलोटातील इगतपुरी येथे विक्रमी 242 मिमी पाऊस 24 तासांत झाला. दारणा पाठोपाठ गंगापूर धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे. भावली धरणाच्या पाणलोटातही 231 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी या धरणाचा साठा 58.72 टक्क्यांवर होता. आज हे धरण 65 टक्क्यांवर पोहचणार आहे.

दरम्यान दारणातून काल रविवारी सकाळी 6 वाजता 500 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर पाण्याची आवक वाढल्याने सकाळी 10 वाजता विसर्ग 1500 क्युसेक करण्यात आला. तासाभरात 11 वाजता 2500 क्युसेक करण्यात आला. नंतर दुपारी 1 वाजता 3860 क्युसेक तर सायंकाळी 4 वाजता तो 5688 क्युसेक करण्यात आला. हा विसर्ग दारणा नदीतून गोदावरीत दाखल होत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने काल सकाळी 8 वाजता 3228 क्युसेकने सुरू असलेला या बंधार्‍यातील गोदावरीत पडणारा विसर्ग 6310 क्युसेकवर नेण्यात आला.

तो काल दिवसभर स्थिर होता. पालखेड धरणातून 6000 क्युसेक ने विसर्ग कादवा नदीत सोडल्याने हे पाणीही गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर मध्ये येत असल्याने रात्रीतून हा विसर्ग 11 हजार क्युसेक पर्यंत वाढलेला असेल. हा सर्वच विसर्ग जायकवाडीच्या दिशेने वाहतो आहे.

काल दिवसभर अधूनमधुन पावसाच्या दमदार सरी बरसत होत्या. त्यामुळे घाटमाथ्यावरील पाणी वेगाने धरणाच्या साठ्यात सामावत आहे. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात जोरदार पावसाचे तांडव सुरु आहे. काल सकाळी मागील संपलेल्या 24 तासात इगतपुरीला 242 मिमी विक्रमी पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 34 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने दारणात 24 तासांत टीएमसी पाणी दाखल झाले. त्यामुळे दारणाचा साठा 60.25 टक्क्यांवर पोहचला होता.

7149 क्षमतेच्या या धरणात 3248 दलघफू म्हणजेच सव्वा तीन टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शेजारील भावलीला 231 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 24 तासात 205 दलघफू नविन पाणी दाखल झाले. 1434 दलघफू क्षमतेच्या भावलीत 842 दलघफू पाणीसाठा काल सकाळी होता. हे धरण 58.72 टक्के भरले आहे. आज सकाळ पर्यंत या धरणात 63 टक्क्या पर्यंत साठा होवु शकतो. 100 टक्के भरल्यानंतर या धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरु होईल. ते दारणाच्या दिशेने धावेल. दारणात काल दिवसभरात 16 मिमी, भावली 48 मिमी असा नोंदला गेला.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही काल दिवसभरात अधुन मधुन पावसाच्या सरी दाखल होत होत्या. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गंगापूर च्या भिंतीजवळ 76 मिमी, पाणलोटातील त्र्यंबकला 94 मिमी, अंबोलीला 92 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे 24 तासांत गंगापूर मध्ये 520 दलघफू म्हणजेच अर्धा टीएमसी पाणी दाखल झाले. त्यामुळे गंगापूर धरण 45.31 टक्के झाले. 5630 क्षमतेच्या या धरणात 2551 दलघफू पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन दिवसात या धरणात 1 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. पावसाचा जोर टिकून राहिल्यास आज सोमवारी गंगापूर निम्याहुन अधिक होईल. काल रविवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत 11 तासात गंगापूर च्या भिंतीजवळ 28 , त्र्यंबकला 15, अंबोलीला 21, कश्यपीला 26, गौतमीला 36 मिमी, असा पाऊस नोंदला गेला.

अन्य धरणांचे कालचे साठे - मुकणे 48.74 टक्के, वाकी 5.86 टक्के, भाम 28 टक्के, वालदेवी 12.09 टक्के, कश्यपी 26.78 टक्के, गौतमी गोदावरी 32.39 टक्के, कडवा 52.78 टक्के, आळंदी 23.77 टक्के, पालखेड 48.55 टक्के पाणी साठा झाला आहे.

पाऊस असा - मुकणे 62 मिमी, वाकी 101 मिमी, भाम 96 मिमी, वालदेवी 42 मिमी, कश्यपी 83 मिमी, गौतमी 77 मिमी, कडवा 50 मिमी, आळंदी 65 मिमी, गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रतील काल सकाळी नोंदलेला पाऊस असा- देवगाव 17 मिमी, ब्राम्हणगाव 7 मिमी, कोपरगाव 14 मिमी, पढेगाव 15 मिमी, सोनेवाडी 12 मिमी, शिर्डी 6 मिमी, राहाता 16 मिमी, रांजणगाव 9 मिमी, चितळी 13 मिमी पावसाची नोंद झाली.

मुळा धरणातील साठा 36 टक्के

कोतूळ |वार्ताहर| Kotul

हरिश्चंद्र गड, पाचनई व अन्य भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग 8770 क्युसेकच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आज मुळा धरणात नवीन पाण्याची आवक आणखी वाढणार आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात सध्या पाणीसाठा 9100 दलघफू आहे.

मुळा पाणलोटात चार पाच दिवसांपासून पावसाचा जोर आहे. त्यामुळे डोंगर दर्‍यांमधील पाणी मुळा नदीत येत होते. मुळा पाणलोटातील 155 दलघफू क्षमतेचा शिरपुंजे बंधारा दुपारी 12 वाजता ओव्हरफ्लो झाला. यापूर्वी मुळा नदीवरील आंबित, पिंपळगाव खांड त्यानंतर कोथळे ही छोटी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे येथील पाणी मुळा नदीत येत आहे.

यंदा या धरणात गतवर्षीपेक्षा चांगला साठा शिल्लक आहे. जोरदार पाऊस होत असल्याने भातखाचरांमध्ये पाणीच पाणी झाल्याने काही ठिकाणी भात आवणीच्या कामाला वेग आला आहे. जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आढळेत आवक सुरू

वीरगाव |वार्ताहर| Virgav

सुर्याच्या पुनर्वसू नक्षत्रात अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने सांगवी(क्षमता-71.23दलघफू) आणि पाडोशी(क्षमता-146 दलघफू) हे दोन्ही लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून देवठाणच्या आढळा मध्यम प्रकल्पात नवीन पाण्याची आवक सुरू झाली. सांगवी-पाडोशी दोन्ही लघुप्रकल्प भरून नवीन पाण्याची आवक आढळाच्या लाभधारकांसाठी समाधानकारक ठरली.

1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पाचा सध्याचा पाणीसाठा 459 दलघफू इतका आहे. मागील शिल्लक पाणीसाठ्यात 45 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने रोहिणी, मृग,आर्द्राने चिंतेत टाकलेल्या लाभक्षेत्राला पुनर्वसूच्या संततधार पावसाने दिलासा दिला. संततधारेमुळे डोंगराचा खडा फुटल्याने आता आढळा नदीत डोंगरद-यातून पाणीआवक जोराची सुरु होईल.

संततधारेने आढळा नदीवरील सावरगाव-पाटचा तव्याच्या प्रपातातून झेप घेणार्‍या पाण्याचे नयनमनोहारी दृश्य बघण्यासाठी आता पर्यटकांची पावलेही आढळा तीरावर स्थिरावत आहेत. आढळेच्या पाणलोट क्षेत्रातील एकदरा ,पाडोशी, सांगवी, केळी, रुम्हणवाडी, बिताका, कोंभाळणे, खिरविरे, समशेरपूर, सावरगाव-पाट, टाहाकारी या गावांच्या डोंगरदर्‍या, ओढे-नाले आणि शेतशिवारांतून पाण्याची चांगली आवक असल्याने आढळा धरणाच्या पाणीसाठ्याचा फुगवटा दिवसागणिक वाढता राहिल. सध्या आढळा धरणात 300 क्युसेक्सने पाणी आवक सुरु आहे.

कुकडीत 1740 दलघफू नव्याने पाणी

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गत 24 तासांत तब्बल 1740 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे काल सकाळी या धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा 3693 दलघफू झाला होता. पिंपळगावजोगे धरणात तब्बल 814 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. या हंगामात प्रथमच या धरणात विक्रमी आवक झाली आहे.

कुकडी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता 30 टीएमसी आहे. या प्रकल्पाव्दारे जुन्नर,आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यातील शेती सिंचनासाठी होतो. रब्बी हंगामातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी या धरणांमध्ये अल्पसा साठा होता. तो आता 13 टक्क्यांवर पोहचला आहे.

येडगाव धरणात 158, माणिकडोह 399, वडज 65, पिंपळगावजोगे 814, डिंभे 304 दलघफू नवीन पाणी आणले. घोड धरणाच्या पावणलोटातही पाऊस होत असल्याने या धरणातही आता आवक होऊ लागली आहे.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

येडगाव - 83, माणिकडोह - 88, वडज - 32, पिंपळगावजोग - 167, डिंभे - 48

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com