जिल्ह्याचा क्राईम रेट राज्यात नंबर वन !

वर्षभरात 21 हजार गुन्हे दाखल : प्रलंबितसह 51 हजार गुन्ह्यांची निर्गती
जिल्ह्याचा क्राईम रेट राज्यात नंबर वन !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सरत्या वर्षामध्ये जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला आहे. जिल्ह्यातील 33 पोलीस ठाण्यामध्ये वर्षभरात 21 हजार 425 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये भाग 5, भाग 6, दारूबंदी, अकस्मात मृत्यू अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हे दाखल होण्यामध्ये नगर जिल्हा महाराष्ट्रात नंबर एक आहे.

दरम्यान, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक असले तरी यामागे वाढती लोकसंख्या, गुन्हा घडल्यानंतर तत्कालन घेतली जाणारी दखल अशी कारणे असून गुन्ह्याचा निपटारा करण्यात पोलिसांना यश आले असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

अधीक्षक पाटील यांनी वर्षभरातील जिल्हा पोलिसांच्या कामगिरीचा लेखाजोखा गुरूवार (दि.30) रोजी पत्रपरिषदेत मांडला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते. 1 जानेवारी ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत जिल्ह्यात भाग पाचनुसार 12 हजार 252 गुन्हे दाखल झाले आहेत. भाग सहानुसार 2 हजार 668, दारुबंदीचे 3 हजार 306, तर अकस्मात मृत्यूचे 3 हजार 199 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 7 हजार 876 गुन्हे अद्याप प्रलंबित आहेत. तर गेल्या तीन वर्षांतील प्रलंबित गुन्ह्यांपैकी एकूण 51 हजार 721 गुन्ह्यांची निर्गती केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

गेल्या वर्षात 56 दरोड्यांचे गुन्हे दाखल झाले, त्यापैकी सर्व गुन्हे उघडकीस आणले आहेत. जबरी चोरीचे 272 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 149 उघडकीस आणले आहेत. घरफोडीचे 796 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 121 उघडकीस आले. तर चोरीचे 3 हजार 92 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी अवघे 702 उघडकीस आले आहेत. चोरी व घरफोडीचे गुन्हे रोखण्यात अपयश आल्याचे त्यांनी कबूल केले. जिल्ह्यात विविध प्रकारच्या संघटीत गुन्हे करणार्‍या तब्बल 401 टोळ्या आहेत. 16 टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

पुर्वी अर्ज दाखल करून घेतले जात होते. परंतू त्याची दखल घेतली जात नव्हती. आता अर्ज दाखल करून घेण्याचे प्रमाण कमी केले आहे. गुन्ह्याचे प्रकार लक्षात घेवुन तो दाखल करून घेतला जात आहे. यामुळे दाखल गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्ह्याचा निपटारा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांची कमी असलेली संख्या व वाढते गुन्हे यामुळे एका अंमलदाराकडे तपास करण्यासाठी वर्षभरात साधारण 50 गुन्हे होते. तरीही वर्षभरात गेल्या तीन वर्षांतील प्रलंबित गुन्ह्यांपैकी 51 हजार 721 गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आला असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

कर्डिलेंच्या लग्नाला गर्दी; 10 हजारांचा दंड

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यास गर्दी जमविल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे. सुरूवातील पोलिसांनी त्यांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटीस दिली होती. यानंतर देखील कर्डीले यांनी मुलगा अक्षय यांच्या विवाहसाठी गर्दी जमविल्याने पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com