आठ महिन्यांत 533 पाणी नमुने दूषित

आरोग्य विभाग 104 ब्लिचिंग पावडर नमुने निकृष्ट
पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. मात्र, दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होत असल्याचेच समोर येत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घेतलेल्या एकूण पाणी नमुन्यांपैकी 4.36 टक्के नमुने हे दूषित आढळून आले आहेत. ही बाब ग्रामीण भागातील जनतेसाठी धोक्याची आहे. दरम्यान, गत आठ महिन्यांत जिल्ह्यात घेण्यात आलेल्या 12 हजार 226 पाणी नमुन्यांत 533 नमुने दूषित आढळून आलेले आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला पुरवठा होणार्‍या पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासण्यासाठी गाव पातळीवर जलसुरक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे जलसुरक्षक नियमतिपणे पाण्याच्या नमुने घेऊन प्रत्येक तालुक्याला असणार्‍या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोग शाळेसह पब्लिक हेल्थ लॅबकडे तपासणीसाठी जमा करतात. त्यानंतर येणार्‍या तपासणी अहवालाची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सादर करण्यात येतो. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, त्या पाण्याचा स्त्रोत दुषित होवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतात.तसेच पाणी शुध्दीकरणासाठी नियमित ब्लिचिंग पावडचा वापर करत पाण्यात 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन असल्यास ते पिण्यास योग्य नाही, असे कळवण्यात येते.

गाव पातळीवर पिण्याचे पाणी दुषित होवू नयेत, प्रयत्न सुरू असताना दर महिन्यांच्या तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून येते. पाणी तपासणीनंतर संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत, तसेच इतर उपाययोजना करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. तरीदेखील जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वी सातत्याने पाणी नमुने दुषित येणार्‍या ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद पातळीवरून कारवाई करण्यात येत होती. मात्र, अलिकडच्या काही वर्षात पाणी नमुने वारंवार दुषित येणार्‍या ग्रामपंचायतींवर कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.

16 ब्लिचिंग पावडरचे नमुने निकृष्ट

जिल्हा परिषद ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसोबत संबंधीत ग्रामपंचायती पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणारी ब्लिचिंग पावडर देखील तपासण्यात येते. मागील महिन्यांत अशा प्रकारे 399 पावडरचे नमुने तपासण्यात आले. पैकी 16 नमुने निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक निकृष्ट पावडर कर्जत आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी सहा गावातील आहे. यात गुरवपिंप्री, रमजानचिंचोली, चांदा बु, चांदा खु, तिखी, थेरगाव या कर्जतच्या तर सोनेवाडी, शहापूर, केतकी, दरेवाडी, निंबोडी, सारोळाबद्दी या नगर तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

आठ महिन्यांतील महिन्यांतील दुषित पाणी नमुने

नगर 4568, अकोले 53, जामखेड 12, कर्जत 7, कोपरगाव 31, नेवासा 7, पारनेर 81, पाथर्डी 63, शेवगाव 31, राहाता 16, राहुरी 93, संगमनेर 30, श्रीगोंदा 36, श्रीरामपूर 5 असे एकूण 533.

नोव्हेंबर महिन्यांतील दूषित पाणी असणारी गावे

अकोले- गुहिरे, कातळपूर, मालेगाव, तेरूंगणा. कोपरगाव- कारवाडी, शिगणापूर, मढी बु. पारनेर- धोत्रे, ढोकी, रुईछत्रपती, नारायण गव्हाण, जातेगाव, गटेवाडी, म्हसोबाझाप. पाथर्डी- शंकरवाडी, शेकटे, खिर्डी, घाटशिरस, कोल्हार, खाडगाव, जावळवाडी, अल्हनवाडी, निपाणीजळगाव. राहाता- हसनपूर, पाथरे बु. राहुरी- कणगर, चांदेगाव, निंभेरे. संगमनेर-वनकुटे, सावरगाव घुले, वरूडीपठार.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com