जिल्ह्यातील 21 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नगर शहर सहकारी बँक, नगर मर्चंट बँक, रुक्मिणी बँक श्रीगोंदा स्वामी समर्थ बँक पारनेर, कोपरगाव पीपल्स बँकेचा समावेश
जिल्ह्यातील 21 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर शहर सहकारी बँक, नगर मर्चंट बँक, रुक्मिणी बँक श्रीगोंदा, स्वामी समर्थ बँक पारनेर, कोपरगाव पीपल्स बँक, छत्रपती ग्रामसेवक पतसंस्था, नगर मजूर फेडरेशन यासह 21 छोट्या-मोठ्या संस्थांचा समावेश आहे.

राज्यात सध्याला सात हजार 143 इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सुरू होता. यात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील सुरू झाल्या आहेत. यातून तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गात 21 सहकारी संस्था येतात. यातील शहर सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चिन्ह देखील वाटप करण्यात आले आहे. या बँकेसाठी 11 डिसेंबरला मतदान होणार आहे. मर्चंट बँकेसाठी मतदारांची प्रारूप यादी देखील जाहीर झाली आहे. इतर संस्थांच्या निवडणुका देखील होत आहे. यातच शासनाचे आदेश आल्याने 20 डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दरम्यान तीन-चार महिन्यांपूर्वीही अशाच पद्धतीने अगस्ती सहकारी साखर कारखाना व जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रियेत मतदान बाकी असताना या निवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर या संस्थांनी न्यायालयात दाद मागितल्यावर त्यांच्या निवडणुका झाल्या. या पार्श्वभूमीवर, सध्या निवडणुका थांबवलेल्या संस्था न्यायालयात जातात की, 20 डिसेंबरपर्यंत वाट पाहतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com