जिल्हा रुग्णालय अग्रीतांडवाचे खापर बांधकाम विभागावर

सहा जणांवर उपचार सुरू, ११ मृतांचा पीएम अहवाल प्राप्त
जिल्हा रुग्णालय अग्रीतांडवाचे खापर बांधकाम विभागावर

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी करोना वॉर्डला लागलेल्या भीषण आगीत अकरा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे खापर सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडत त्यांना जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाची पाठराखण करताना सात दिवसांत चौकशी समिती अहवाल देणार असून त्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी सारवासारव आरोग्य मंत्री न्टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

दरम्यान, शनिवारच्या जिल्हा रुग्णालयातील आगीचे पडसाद राज्यासह देशपातळीवर उमटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून जखमींची विचारपूस करून ते लवकर बरे व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. घटना घडल्यानंतर शनिवारी रात्रीपर्यंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे प्रभारी विशेष महानिरिक्षक दीपक पांडे यांनी घटनास्थळाची पाहणी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

तर रविवारी सकाळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे त्यानंतर सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयात जावून घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री टोपे यांनी आरोग्य विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. इमारतीचे बांधकाम आणि इतर सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करण्याची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असते, असे स्पष्ट करत या घटनेत आरोग्य विभागाची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल्ससाठी तीन कोटी रुपयाचे प्रस्ताव तयार झाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले. मात्र, अद्यापही बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता दिली नसल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले. एकंदरीत नगर शासकीय रुग्णालयातील घटनेला बांधकाम विभागच जबाबदार असल्याकडे मंत्री टोपे यांचा रोख होता. पत्रकारांनी जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधात असलेल्या तक्रारी आणि मृतांच्या नातेवाईकांची बडतर्फीची मागणी याकडे लक्ष वेधले असता नंतर मंत्री टोपे यांनी अहवाल आल्यानंतर सर्व दोषींवर कारवाई केली जाईल अशी सारवासारव करत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. दरम्यान, अग्नीतांडवात मृत्यूमुखी पडलेल्यांचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाख आणि राष्ट्रीय आपत्ती निधीतून २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीपोटी प्राथमिक स्वरूपात एका मृताच्या नातेवाईकास २ लाख रूपयांचा मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. तर इतरांना दोन दिवसांत मदत देण्यात येणार आहे.

रुग्णांचा गुदमरून, होरपळून मृत्यू; उत्तरीय तपासणीचा अहवाल

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांचा उत्तरीय तपासणी अहवाल समोर आला आहे. यामध्ये सहा रुग्णांचा मृत्यू गुदमरून, एकाचा भाजून तर तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका रुग्णाचा उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे.

करोना अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी आग लागली होती. यात १७ रूग्णांपैकी ११ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर रूग्णांचा मृत्यू हा आगीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कारवाईची दिशा स्पष्ट होते. ही आग कशामुळे लागली याचा शोध होणे आता गरजेचे ठरले आहे. घटनेची जबाबदार निश्चित करून हलगर्जीपणा करणार्या विरोधात कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. आग लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार, माजी मंत्री, विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी भेट दिल्या. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देखील या घटनेविषयी शोकसंदेश व्यक्त केला. चौकशी समिती नियुक्त झाली असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सहा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडवात जखमी झालेल्या त्या सहा रुग्णांवर नगरमधील एका बड्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या धुरामळे त्यांचा श्वास गुदमरला होता. आधीच करोना बाधित असताना आगीच्या धुरात श्वास गुदमरल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले.

अहवालाच्या आधारे दोषारोपपत्र दाखल करा

महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी शासकीय रुग्णालयांना आग लागली. त्यामध्ये लोकांचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात चौकशी समिती नियुक्ती केल्या होत्या, त्याचा अहवालाच्या त्याआधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशी माझी सरकारला विनंती आहे. आपत्तीव्यवस्थापनच्या दृष्टीने पूर्व तयारी आवश्यक असून अशा घटना घडू नये, यासाठी सरकारने पूर्व तयारी करावी, अशी मागणी विधानसभेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी केली. करोना काळात सरकारकडून चांगले काम झाले आहे. सरकार चालढकल करत असते तर प्रत्येक ठिकाणी मदत करण्यासाठी सरकाने प्रयत्न केला नसता, कृपा करून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नका, असेही आ. गोऱ्हे म्हणाल्या.

कोणालाही सोडणार नाही

प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र फायर अधिकारी असावा, त्याला बारकाईने काम करता येईल, त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याविषयी वारंवार तक्रारी झाल्या असल्याची बाब मंत्री टोपे यांच्या लक्षात आणून दिली असता ते म्हणाले, या घटनेसंदर्भात प्रशासकीय जबाबदारीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या काही त्रुटी आढळून आल्या असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणालाही पाठीमागे घालण्याचा प्रयत्न राहणार नाही. पाच ते सहा दिवस थांबा, एकदा चौकशी पूर्ण होऊ द्या, कोणालाही सोडणार नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

चौकशी समितीने नोंदविले जबाब

जिल्हा रुग्णालयातील आगीची चौकशी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आहे. या चौकशी समितीमध्ये आठ जणांचा समावेश आहे. यातील तीन अधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा रूग्णालयात भेट दिली. त्यांनी प्राथमिक चौकशी केली. रुग्ण, नातेवाईक, अधिकारी यांच्याशी चर्चा केली. काहींचे जबाब नोंदविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. समितीचे सदस्य जिल्हा रूग्णालयात ठाण मांडून असून झालेल्या घटनेबाबत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन चौकशी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com