जिल्हा रूग्णालयातील आगीचे कारण शोधण्यासाठी 'या' अधिकाऱ्यांचे पथक नगरमध्ये

जिल्हा रूग्णालयातील आगीचे कारण शोधण्यासाठी 'या' अधिकाऱ्यांचे पथक नगरमध्ये

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 करोना रूग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू झाली आहे.

अतिदक्षता विभागाला आग कुठून आणि कशामुळे लागली याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याने सोमवारी सकाळी राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या पथकाने अतिदक्षता विभागाची बारकाईने पाहणी करून नोंदी घेतल्या आहेत.

दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक खोंडे त्यांच्यासोबत शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी उपस्थित होत्या.

जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी आग लागून 11 रूग्णांचा मृत्यू झाला. सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू झाला आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. रविवारी समितीच्या सदस्यांनी रूग्णालयाला भेट देऊन काही लोकांचे जबाब नोंदविले. दरम्यान अतिदक्षता विभागाला आग कुठून व कशामुळे लागली याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याने राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक सोमवारी सकाळी पथकासह रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या पथकाने अतिदक्षता विभागाची बारकाईने पाहणी केली. यावेळी पोलीस पथक त्यांच्या सोबत होते. आगीप्रकरणी बारकाईने नोंदी घेऊन त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच पोलिसांकडून विद्युत विभागाचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

करोनाच्या काळात या नवीन इमारतीचा वापर सुरू झाला होता. याच दरम्यान विद्युत यंत्रणेतील दोष व त्रुटींबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रूग्णाालयाला पत्र देण्यात आले होते. ते पत्र यानिमित्ताने चर्चेत आले आहे. पोलिसांकडे हे पत्र उपलब्ध झाले असल्याची माहिती आहे.

या पत्रात सदोष व्यवस्थेमुळे आगीची घटना घडू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. यामुळेच राज्य सरकारचे विद्युत निरीक्षक यांनी रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यापुढे याबाबतच्या दोष व त्रुटींचा शोध घेण्याचे आव्हान आहे. चौकशी समिती व पोलिसांना याबाबत ते अहवाल सादर करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com