नगर अग्नितांडव: पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, चौकशीनंतर कारवाई

नगर अग्नितांडव: पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, चौकशीनंतर कारवाई

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा रुग्णालयातील घडलेली घटना दुर्दैवी असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. या घटनेमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी अहमदनगरला येत जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची रात्री पाहणी केली. आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्यात येणार आहे. अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. फायर ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत, असे असतानाही अशा घटना घडतात हे दुर्दैव आहे.

ही घटना दिवसा घडली असून पोलिसांनी त्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांची चौकशी समिती नेमून चौकशी केली तरी पुढे काही कारवाई झाली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, घटना दिवसा घडली आहे, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात आहे, चौकशी समिती नेमून लवकरच अहवाल येईल यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संपूर्ण घटनेची चौकशी होणार, या वाक्यावर जोर दिला होता.

विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पाण्डेय यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येणार असून विभागीय आयुक्त यांच्या चौकशीनंतर आरोपींची नावे निश्चित होतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com