‘त्यांचा' खटाटोप झळकण्यासाठी; खा. विखेंचा आ. रोहित पवारांना टोला

‘त्यांचा' खटाटोप झळकण्यासाठी; खा. विखेंचा आ. रोहित पवारांना टोला

अहमदनगर (प्रतिनिधी)

प्रत्येक घटनेबाबत केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. अशा दुर्घटना वेळी राजकीय वक्तव्य करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.

दिवसभर टिव्ही चॅनलवर झळकत राहण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यातलेच हे एक आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया खासदार डॉ. सुजय विखे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळून दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खा. डॉ. विखे होते. पंतप्रधान निधीतून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन ही आग लागल्याच्या आ. पवार यांच्या आरोपावर भारती पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी खा. विखे यांना आ. पवार यांच्या आरोपावर भाष्य करण्यास सांगितले.

त्यावर खा. विखे यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सकाळपासून येथे आहोत. पण कोणावरही आरोप केला नाही. ही घटना आणि वेळ कोणावरही आरोप करण्यासारखी नाही. कोणी राजकारण जर येथे करत असेल आणि असे कोणी वक्तव्य करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली. दिवसभर न्यूज चॅनलवर झळकत राहण्यासाठी हा खटाटोप आहे. प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखवायचे आणि आरोप करत राजकारण करायचे असाच काहीसा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com