नगर अग्नितांडव : धूर निघाला तरी होते ढिम्म !

धक्कादायक माहिती उघड; तत्परता दाखवलीच नाही
नगर अग्नितांडव : धूर निघाला तरी होते ढिम्म !

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला आग लागली त्यावेळी तेथे फक्त काही कर्मचारी हजर होते. डॉक्टर त्याठिकाणी नव्हते, हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी थोडी तत्परता दाखविली असती, तर काही रुग्णांचे जीव वाचले असते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी दुजोरा दिला.

जिल्हा रुग्णालयाच्या आगीत ११ लोकांचा बळी गेला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके याप्रकरणी तपास करीत आहे.

दरम्यान, सोमवारी उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांनी जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला भेट देऊन सुमारे दोन ते अडीच तास पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक मिटके, निरीक्षक ज्योती गडकरी आदी उपस्थित होते. उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांनी जिल्हा पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी तपासात काही व्यक्तींचे जबाब नोंदविले आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यातून काही धक्कादायक माहिती समोर आली.

अतिदक्षता विभागाला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी अतिदक्षता विभागात स्वच्छता सुरू होती. रूग्णांचे नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले होते. आग लागली त्यावेळी फक्त काही कर्मचारी अतिदक्षता विभागात हजर होते. डॉक्टर त्याठिकाणी नव्हते. सुरूवातील धूर निघाला तेव्हा अतिदक्षता विभागात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविली नाही. थोडी तत्परता दाखविली असती तर काही रुग्णांचे जीव वाचले असते. अशी माहिती तपासात पुढे आली आहे. यामुळे याप्रकरणी आता पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान आग कशामुळे लागली, त्याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून विद्युत तज्ञांची मदत घेतली जात आहे. सोमवारी राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षकांनी पथकासह जिल्हा रूग्णालयातील आग लागलेल्या करोना अतिदक्षता विभागाला भेट दिली. विद्युत तज्ञांचे जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com