नगर अग्नितांडव : दुसऱ्याच्या चुकीचे खापर फोडू नका!

परिचारिकांच्या निलंबनाविरोधात घोषणाबाजी । राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
नगर अग्नितांडव : दुसऱ्याच्या चुकीचे खापर फोडू नका!

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेत ११ जणांच्या बळीनंतर शासनाकडून कारवाई सुरू झाली आहे. मात्र या घटनेस जबाबदार धरून परिचारीकांचे निलंबन करणे वा सेवा समाप्त करणे अन्यायकारक आहे. त्यांना दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा करणे अयोग्य असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. याविरोधात मंगळवारी घोषणाबाजी करण्यात आली. परिचारिकांना तातडीने कामावर न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये ६ नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत 11 रुग्ण मृत्यूमुखी पडले. यास जबाबदार धरून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह सहा जणांना निलंबित आणि सेवा समाप्तीचे आदेश दिले. या कारवाईमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या तीन परिचरिकांचा समावेश आहे. त्यांच्यावर शासनाने केलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचे सांगत मंगळवारी सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली.

अतिदक्षता विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाची सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा याची जबाबदारी ही वरिष्ठांची आणि त्या स्तरावरील विभागांची असते. मात्र अचानक आग लागल्यानंतर त्यास जबाबदार धरून परिचरिकांना निलंबित करणे, सेवा समाप्ती करणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे निलंबन किंवा सेवासमाप्ती कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी अन्यथा राज्यभरातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी आवाज उठवतील आंदोलन करतील. त्याचबरोबर यापुढे अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यास नकार दिला जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

जीवही वाचवला आहे...

सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही कार्यरत असणार आहोत. मात्र अन्यायकारक पद्धतीने झालेल्या निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये शासकीय परिचारिकांनी अहोरात्र काम केले असून अनेक रुग्णांचा जीव वाचवला आहे. आपल्या जीवावर उदार होऊन परिचारिकांनी काम केले आहे. या कामाचे कौतुकही करण्यात येत असताना आता दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा परिचारिकांना देणे चुकीचं असल्याचं यावेळी या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com