
अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची 30 जून 2016 पुर्वीची थकबाकी असलेल्या सभासदांकरीता जिल्हा बँकेने ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना 2023’ सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार सभासदांनी त्यांचे अर्ज 31 डिसेंबर 2023 पूर्वी आपल्या विविध कार्यकारी सोसायटीत व शाखेत सादर करावेत, या योजनेचा थकबाकीदार शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांनी केले आहे.
चेअरमन कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील सेवा सोसायट्यांच्या सचिवांची आढावा बैठक पार पडली. यावेळी बँकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, सिताराम पाटील गायकर, माजी आमदार राहुल जगताप, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, करण ससाणे, असिस्टंट रजिस्टार देवीदास घोडेचोर आदी उपस्थित होते. योजनेबाबत माहिती देताना कर्डीले म्हणाले, या योजनेत थकबाकीदार शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. अर्ज 31 डिसेंबर 2023 पूर्वी आपल्या विविध कार्यकारी सोसायटीत व शाखेत सादर करावेत. पीक कर्ज अथवा इतर कर्ज नियमित परतफेड न केल्यास शेतकर्यांना मोठा भुर्दंड बसतो. थकीत पीक कर्जाला 11 टक्केच्यावर व्याजदर आकारणी होत असते. त्यामुळे कर्जदार शेतकर्यांनी आपले कर्ज वेळेत भरण्याचे आवाहन कर्डीले यांनी केले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसाठी व्यवसायांकरीता राबवणार्या योजनांची माहिती दिली. सोसायट्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता या योजनेत सहभागी होणे बाबत सांगीतले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आपल्या प्रस्ताविकात वसुली, ठेवी वाढीबाबत मार्गदर्शन केले व सेवा सोसायटीने केंद्रशासित संगणकीकरण योजनेत आक्रमक काम करून आपल्या सेवा सोसायट्या लवकरात लवकर केंद्रशासित संगणकीकरण योजनेत संस्था संगणकीकरण करून घेण्याबाबत सुचना केल्या.
त्वरीत पीक कर्ज मिळणार
बँकेने सुरू केलेल्या ‘एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेणार्या थकबाकीदार शेतकर्यांना बँक त्वरीत नियमित पीक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे सदर शेतकरी नियमित कर्जदार होत असल्याने सदर कर्जदारांना तीन लाख रूपये पीक कर्जापर्यंत शुन्य टक्के व्याज दराचा फायदा होणार असल्याचे चेअरमन कर्डीले यांनी सांगितले.