अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँकेच्या 21 संचालकांपैकी 4 जागा आधीच बिनविरोध निघालेल्या आहेत. उर्वरित 17 जागा बिनविरोध काढता येतील का?

याची चाचपणी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत घेतली. विशेष म्हणजे या चाचपणी बैठकीला कोपरगावमधून भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि अकोल्यातील भाजप समर्थक विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी महसूलमंत्री थोरात संगमनेरात दाखल होताच, त्यांनी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकारातील नेत्यांना संगमनेरला येण्याचा निरोप दिला. निरोप मिळताच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे, स्नेहलता कोल्हे, ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, माजी आ. राहुल जगताप, विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर, माधवराव कानवडे, करण ससाणे यांच्यासह जिल्ह्यातील नेते संगमनेरमध्ये दाखल झाले. यावेळी मंत्री थोरात आणि राज्यमंत्री तनपुरे यांनी मतदारसंघ आणि तालुकानिहाय मतदारांची माहिती या नेत्यांकडून घेतली.

बँकेची निवडणूक बिनविरोध करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी यावेळी घेण्यात आली. संपूर्ण निवडणूक बिनविरोध करता येणे शक्य नसल्यास जे मतदारसंघ बिनविरोध होऊ शकतात, ते काढून घ्यावेत, त्यानंतर पुढील निर्णय घेवू या मतापर्यंत बैठकीत चर्चा झाली. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतांनाच निवडणूक झाल्यास आपले मतदार जपा, उद्या कोणतीही परिस्थिती निर्माण होवू शकते. यासाठी आतापासून तयारी आणि नियोजन करा. मतदानाची वेळ आल्यास पॅनल टू पॅनल मतदान झाले पाहीजे, यासाठी काळजी घेण्याच्या सुचना मंत्री थोरात यांनी दिल्या.

ना. थोरात-मुरकुटे भेट

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी काल महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची संगमनेरात भेट घेतली. मुरकुटे यांनी ओबीसी आणि सोसायटी अशा दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही मतदारसंघातून उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचेही अर्ज आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, करण ससाणे यांनीही काल संगमनेरात ना. थोरात यांची भेट घेतली.

बँकेच्या सोसायटी मतदारसंघातील विषय जवळपास संपूष्टात आला असला तरी उत्तरेतील एका तालुक्यात अडचण आहे. मात्र, मंत्री थोरात त्यावर कोणता उपाय शोधणार हे लवकर समोर येणार आहे. दरम्यान, पाच राखीव जागा आणि शेती पूरक आणि बिगर शेती मतदारसंघातून थोरात गटाकडून कोण निवडणूक रिंगणात उतरणार हे आताच सांगता येणे कठीण असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. आज बँक बिनविरोध होण्याची परिस्थिती असली तरी 11 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत संपेपर्यंत काहीही होवू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.