अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय पॅनलची चर्चा आता वावड्या असल्याचे स्पष्ट होत आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

यांनी जिल्हा सहकारी बँकेतील पक्षविरहीत राजकारणाचा आदर राखत स्थानिक नेत्यांंना निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे सुत्रांनी सांगितले. दुसरीकडे स्थानिक राजकारणामुळे राष्ट्रवादीतून प्रारंभी असलेला विरोध मावळल्याने भाजपच्या नेत्यांना पवार-थोरात पॅनलमध्ये स्थान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील सहकारावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय जोडे बाहेर काढण्याची परंपरा आहे. पवार-थोरात समर्थकांचे वर्चस्व असलेल्या बँक निवडणुकीत काय होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष होते. पक्षीय आघाड्यांचा दावा नेत्यांकडून झाल्याने यावेळी काही वेगळे घडणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अखेर निवडणूक मळलेल्या वाटेनेच पुढे जात असल्याचे दिसून आले.

जिल्हा बँकेत पक्षीय पॅनलची चर्चा भाजपाकडून सुरू झाली होती. अपवाद वगळता स्थानिक नेते मात्र यास राजी नव्हते. शेवटी जिल्ह्यातील सहकार अर्थकारणाचा कणा असलेल्या या संस्थेत पक्षीय राजकारण नको, या मतापर्यंत फडणवीस आल्याचे म्हटले जाते. त्यांनी आपला निर्णय स्थानिक नेत्यांना दिला आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना थोरात गटासोबत जाण्याचा मार्ग निर्वेध झाला आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ‘मी थोरातांच्या भेटीसाठी गेलो होतो आणि पुन्हा जाणार आहे. मात्र बँकेबाबत फडणवीस यांच्याकडून जो निर्णय येईल, तो मान्य असेल.’ असे निक्षून सांगीतले होते. त्यावरून भाजपातील स्थानिक नेत्यांना काय निर्णय होणार, याचा अंदाज आधीच होता, असे मानले जात आहे.

दरम्यान, स्थानिक राजकारणामुळे दोन मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना सोबत घेण्यावरून राष्ट्रवादीत नाराजी होती. मात्र एका ज्येष्ठ नेत्याने ही नाराजी दूर केल्याची माहिती आहे. तर सह्याद्रीच्या खोर्यातील एकाला स्वीकारण्यास खुद्द बारामतीकर तयार नव्हते. अखेर त्यावरही तोडगा काढण्यात आल्याचे म्हटले जाते. अखेरच्या टप्प्यात मुंबईत झालेल्या बैठकीत पवार-थोरात पॅनलमध्ये भाजपातील कोणते नेते असतील, हे देखिल निश्चित झाल्याचा दावा सूत्रांनी केला.

विखेंच्या खेळीकडे लक्ष

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपातील नेते पवार-थोरात गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित झाल्याने भाजपाचे नेते माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खेळीकडे सहकारक्षेत्राचे लक्ष आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांपुढे विखे समर्थकांनीच अर्ज दाखल केले आहेत.