अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने पक्षीय राजकारण बाजूला

ठेवून भाजपमधील समविचारी गटाला सोबत घेण्याबाबत शुक्रवारी पुण्यातील बैठकीत चर्चा केली. बैठकीत एका मातब्बर नेत्याने भाजपमधील ‘समविचारी’ गटाला सोेबत घेऊन बँक हित साधण्याचा आग्रह धरला. यावर अंतिम निर्णय मात्र झाला नाही. पॅनल व भाजपतील समविचारी गट या मुद्यांवर शनिवारी नगरमध्ये होणार्या संभाव्य बैठकीत निर्णयाची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल बाळासाहेब थोरात आवर्जून उपस्थित होते. जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते बैठकीत सहभागी झाले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. अरूण जगताप, आ.आशुतोष काळे, आ.किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, श्रीगोंदा साखर कारखान्यांचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अविनाश आदिक यांचा त्यात समावेश होता.

पवार आणि थोरात यांनी प्रारंभी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची स्थिती जाणून घेतली. त्यानंंतर दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बँकेच्या निवडणुकीविषय मते मांडली. तसेच पॅनल कसे तयार करता येऊ शकेल, यावर चर्चा झाली. बँकेत चांगली लोक संचालक म्हणून निवडून येण्यासाठी भाजपमधील एका गट सोबत येण्यास तयार आहेत. त्यांना सोबत घेणे बँकेसाठी सोईचे आहे, असा मुद्दा एका मातब्बर नेत्याने मांडला. त्यावर अजित पवार यांनी जिल्ह्यातील समविचारींना सोबत घेऊन पॅनल तयार करण्याच्या सुचना दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपमधील समविचारींना सोबत घेण्याबाबत अंतिम निर्णय झाला की नाही, याबाबत अस्पष्टता होती. निवडणुकीसाठी पॅनल तयार करण्यासाठी पवार, थोरात व गडाख यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, बैठक संपल्यावर उपस्थित अनेक नेत्यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचा सूर आवळला.

गडाख-पवार यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

बैठकीला शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख अनुपस्थित होते. मुळा कारखान्यांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीमुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार व गडाख यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली.

जिल्हा बँकेसाठी आतापर्यंत दोन प्रमुख बैठका झाल्या. पवार, थोरात आणि गडाख यांची एकत्रित बैठक झाल्यानंंतर निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.