अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. रविवारी नगरमध्ये भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी झालेल्या

चर्चेनुसार पुढील दोन दिवसांत निर्णय घेण्यासाठी सुत्रे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडे देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा बँक निवडणूक प्रक्रीया सुरू आहे. माघारीसाठी अखेरचे चार दिवस शिल्लक आहेत. यावेळी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक गाजत आहे. रविवारी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ.बबनराव पाचपुते, आ.मोनिकाताई राजळे, माजी आ.स्नेहलताताई कोल्हे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आ.वैभव पिचड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, विवेक कोल्हे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी जिल्हा बँक हा स्थानिक विषय असल्याने आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घ्यावा, अशा सुचना स्थानिक नेत्यांना दिल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ही बैठक लक्षवेधी ठरली. स्थानिक नेत्यांवर पक्षीय पॅनलसाठी असलेला दबाव, काही नेत्यांपुढे समर्थकांकरवी उभे करण्यात आलेले आव्हान यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार, याबाबत बैठकीला जाणारे काही नेते उत्सुक होते.

बैठकीत पक्षीय किंवा स्वतंत्र पॅनलवर चर्चा झाली. सोबतच मतांची गोळाबेरीज वेगळे संकेत देत असेल तर बँक निवडणूक बिनविरोध शक्य आहे का, यावरही चर्चा झाल्याचे समजते. काही नेत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात पूर्वसुचना न देता स्वपक्षीय नेत्यांनीच उमेदवार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बिनविरोध झालेल्या एका मतदारसंघात उभा करण्यासाठी ‘समर्थक’ न मिळाल्याबद्दल एकाने आश्चर्य व्यक्त केल्याचे समजते. चर्चेअंती भाजपच्या गटासाठी योग्य आणि सन्मानजनक निर्णय घेण्याची जबाबदारी विखे-कर्डिले-पिचड यांच्यावर सोपविल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोन दिवसांत हे नेते सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, पक्षातील काही नेत्यांनी आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे विधान एका नेत्याने ‘सार्वमत’सोबत औपचारिक चर्चेत केल्याने कर्डिले यांच्या घरी झालेल्या बैठकीतील ‘अंतरंग’ नेमके काय होते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

आमचा निर्णय ठरला

जिल्हा बँकेची निवडणुकीत पक्षीय भुमिका नसते. सहकाराचा कणा असलेल्या बँकेत राजकारण आणायचे नाही, असा शिरस्ता आहे. तो यावेळी देखिल मोडण्याची शक्यता कमी आहे. बैठका होतच असतात. आमचा जो काही निर्णय आहे तो झालेला आहे, अशी प्रतिक्रीया एका नेत्याने दिली.

आजपासून माघारमंत्र

जिल्हा बँक उमेदवारीच्या माघारीला सोमवारपासून वेग येणार आहे. स्थानिक नेते सोसायटी मतदारसंघ बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी नगर शहरात दाखल होणार होते. मात्र अन्य राज्यातील दौर्यामुळे त्यांनी 10 व 11 फेब्रुवारी असे दोन दिवस नगरसाठी राखून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.