अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बड्या नेत्यांच्या जागा बिनविरोध झाल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीच्या गोटात सुस्ती

दिसत होती. नेमक्या संधीचा फायदा विरोधी गटाचे उमदेवार दत्तात्रय पानसरे यांनी घेतला आणि जिल्हाभर जोमाने प्रचार केला. अखेरच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातल्याने प्रशांत गायकवाड यांचा विजय झाला.

नगर, राहाता आणि पाथर्डीत पानसरे यांना मतांची आघाडी मिळाली. त्यांनी पराभव झाला असला तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व असलेल्या तालुक्यातही चांगली मते ‘गोळा’ केल्याचे दिसून आले.

बिगर शेती मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अखेरच्या काही दिवसांत रंगत आली. पानसरे यांच्यासाठी उत्तरेतील यंत्रणा आणि नगरमधील ‘सोधा’ धावून आली. यासह काही तालुक्यात थोरात आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असतांनाही पानसरे यांना अपेक्षीतपणे चांगली मते मिळाली. याचा अर्थ या मतदारसंघातील मतमोजणी तालुकानिहाय ऐवजी एकत्र झाली असती, तर बिगर शेतीमतदारसंघाचा निकाल वेगळा लागला असता.

नगर तालुक्यातून पारनसरे यांना 128 मते मिळाली असून त्या ठिकाणी गायकवाड यांना 88, पाथर्डीत पानसरे यांना 17 तर गायकवाड यांना 12 आणि राहाता तालुक्यात पानसरे यांना 97 तर गायकवाड यांना 34 मते मिळाली. अन्य तालुक्यात पानसरे यांना चांगली मते मिळाली. यात अकोल्यात 58 पैकी 22, जामखेडमध्ये 46 पैकी 16, कर्जतमध्ये 64 पैकी 25, कोपरगावमध्ये 159 पैकी 44, नेवासात 83 पैकी 31, पारनेरमध्ये 78 पैकी 29, राहुरीत 100 पैकी 42, संगमनेरमध्ये 228 पैकी 64, शेवगावमध्ये 22 पैकी 3, श्रीगोंद्यात 66 पैकी 28 आणि श्रीरामपूरात 60 पैकी 28 मते पारनसरे यांच्या पारड्यात पडलेली आहे. यामुळे अनेक तालुक्यात क्रॉस व्होटिंग झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

चार मते बाद

बिगरशेती मतदारसंघातील चार मतपत्रिका बाद ठरवण्यात आल्या आहेत. यात तीन मतपत्रिका कोर्या होत्या. तर एकावर सही होती. या मतपत्रिका अकोले, कर्जत, कोपरगाव आणि नगर तालुक्यातील होत्या.

पानसरे यांच्या गायकवाड यांना शुभेच्छा

साधारण सकाळी 10.30 वाजता बिगरशेती मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. दरम्यान बँकेच्या आवारात प्रशांत गायकवाड यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण सुरू केली. याच दरम्यान विजयी उमेदवार गायकवाड दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून खांद्यावर घेतले. त्यानंतर गायकवाड मतमोजणीच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी पराभूत उमेदवार दत्तात्रय पानसरे आणि विजयी गायकवाड यांची भेट झाली. यावेळी पानसरे यांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.