जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

भरारी पथकाकडून तपासणी || काही केंद्रांना नोटिसा
कृषी सेवा केंद्र (File Photo)
कृषी सेवा केंद्र (File Photo)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कृषी विभागाने खरीप हंगाम 2023 च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जादा दराने निविष्टा विक्री करणे, खताची लिंकिंग, बोगस खते व बी-बियाणे, साठा पुस्तके, खरेदी-विक्री व्यवहार नोंद वही, विक्री परवाने आदी कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित कृषी केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिले आहेत.

भरारी पथकामार्फत सुरू असलेल्या तपासणीत राहुरी, नेवासे, पारनेर येथील प्रत्येकी एक कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित केला आहे. काही केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या फसवणुकीच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक तक्रार निवारण कक्ष कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी 10 ते सायंकाळी 6.15 पर्यंत सुरू असेल.

फसवणूक झाल्यास या वेळेत ते तक्रार करू शकतात. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, यासाठी खरेदी-विक्री, पक्की बिले घेणे, घेतलेल्या बियाण्यांचा टॅग जपून ठेवले, बियाण्यांचा सॅम्पल काढून ठेवणे आदी बाबींची काळजी शेतकर्‍यांनी घ्यावी. फसवणूक झाल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना येत्या खरीप हंगामात उत्कृष्ट बियाणे, निविष्टा योग्य दरात उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी केलेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com