करोना रुग्णांत वाढ, 61 गावे दहा दिवसांसाठी बंद
बंद

करोना रुग्णांत वाढ, 61 गावे दहा दिवसांसाठी बंद

दहा पेक्षा अधिक करोनाचे सक्रिय रुग्ण सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील 24 गावांचा समावेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी आणि दहापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणार्‍या गावांत कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. यासह जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी आदेश काढत येत्या दहा दिवस म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाऊन लावला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या लॉकडाऊनच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले की, जिल्ह्यात दैनदिन करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे 500 ते 800 आहे. तसेच जिल्ह्यातील करोना बाधित होण्याचे प्रमाण हे पाच टक्क्यापेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात 20 पेक्षा अधिक सक्रिय करोना रुग्ण असणार्‍या गावांत प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करणे, गावातील नागरिकांचे प्राधान्याने 100 टक्के लसीकरण करणे, कोविड नियमानुसार वर्तणूक ठेवणे, चाचण्या वाढविणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.

मात्र, असे असताना दहा पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणार्‍या गावात या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील 2 ऑक्टोबरच्या जिल्ह्यातील दहा पेक्षा अधिक सक्रिय करोना रुग्ण असणार्‍या गावात अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, करोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व 4 ऑक्टोबरला पहाटे 1 वाजल्यापासून ते 13 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी काढले असून या गावात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच या गावाच्या हद्दीतून कृषी माल आणि आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंदी राहणार आहे.

यात सर्वाधिक गावे ही संगमनेर तालुक्यातील 24 असून श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता 7, पारनेर 6, शेवगाव 4, अकोले 3, श्रीरामपूर 3, कर्जत 2, कोपरगाव 1, नेवासा 1, पाथर्डी 1 या गावांचा समावेश आहे.

करोनाचे 461 रुग्ण वाढले

जिल्ह्यात रविवारी 752 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 461 करोनाचे रुग्ण वाढल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 985 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 109, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 227 आणि अँटीजेन चाचणीत 125 रुग्ण बाधीत आढळले.

राहाता 7, पारनेर 6, शेवगाव 4, अकोले 3, श्रीरामपूर 3 गावांत निर्बंध

लॉकडाऊन जाहिर केलेल्या गावांमध्ये लिंगदेव, वीरगाव, परखतपूर (अकोले), खांडवी, बाभूळगाव दुमाला (कर्जत), गोधेगाव (कोपरगाव), कुकाण (नेवासा), वडनेर बु., कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी (पारनेर), तिसगाव (पाथर्डी), भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, कोर्‍हाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु. (राहाता), गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी (संगमनेर), भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाणे बु., (शेवगाव), लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी (श्रीगोंदा), बेलापूर खुर्द, उक्कलगाव आणि कारेगाव (श्रीरामपूर ) यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.