जिल्ह्यात 27 वीज उपकेंद्रांच्या कामांना कार्यारंभ आदेश

 प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महाविकास आघाडी सरकारच्या कृषी ऊर्जा धोरणामुळे जिल्ह्यात 27 वीज उपकेंद्राच्या कामांचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती माजी ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

आ. तनपुरे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी विजेचे प्रश्न विशेषतः शेतकर्‍यांच्या विजेच्या अनेक समस्या होत्या. त्या मार्गी लावण्यासाठी कोणतीही तरतूद वा योजना अस्तित्वात नव्हती. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतीच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी कृषी धोरण 2020 राबविण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे राज्यातील शेतीसह अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागल्याचा तसेच त्याचा जास्तीत जास्त फायदा नगर जिल्हाला झाल्याचा दावा माजी ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यात जेव्हा भाजप सरकार सत्तेवर होते त्याकाळात शेतीच्या विजेच्या खूप मोठ्या समस्या होत्या. ह्या काळात वीज पुरवठा खंडीत झाला तरी तो पूर्ववत सुरु करण्यास अनेक अडचणी येत असत. शेतकर्‍यांना रोहित्र ओव्हरलोड झाल्यावर नवीन रोहित्र बसविण्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद नव्हती. त्यामुळे वारंवार रोहित्र जळाले तरी नवीन रोहित्र देणे महावितरणसाठी खूप अवघड जात असे. तसेच राज्यातील बरेच वीज उपकेंद्र व वाहिन्या (फीडर) देखील ओव्हरलोड असल्यामुळे शेतकर्‍यांना सतत लोडशेडींगचा सामना करावा लागत असे. यासाठी देखील पूर्वीच्या भाजप सरकारमध्ये कोणतीही स्कीम नव्हती.

या सर्व अडचणी लक्षात घेऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या अडचणी समजावून घेत त्या सोडविण्यासाठी कृषी धोरण 2020 आणले व ते राबविण्याचा आघाडी सरकारने निर्णय घेतल्याने त्याची फलनिष्पत्ती आता दिसू लागली आहे. राज्याचा ऊर्जा राज्यमंत्री असल्याने कृषी धोरण 2020ची अंमलबजावणी राज्याबरोबरच राहुरी नगर पाथर्डी मतदार संघात देखील प्रभावी पणे राबविण्याचा आपण निर्णय घेतला.

यामध्ये राहुरी मतदारसंघ तसेच तालुक्यात चिखलठाण, ताहाराबाद, शिराळ, वांजुळपोई, व पिंपळगाव माळवी येथे नवीन वीज केंद्र मंजूर केले होते. यातील 4 वीज उपकेंद्र राहुरी मतदार संघातील तर वांजुळपोई हे वीज उपकेंद्र हे राहुरी तालुक्यातील (श्रीरामपूर मतदार संघातील) आहे. या सर्वांसाठी 17 कोटी रुपयेचा निधी तत्कालीन महाविकास आघाडी शासनाच्या काळात मंजूर करण्यात आला होता.

मतदार संघातील चिखलठाण येथील नवीन वीज उपकेंद्र 5 एमव्हीए क्षमतेचे असून त्यासाठी 4 कोटी 25 लाख रुपये खर्चास तत्कालीन पालक मंत्री ह्यांनी 12 एप्रिल 2021 रोजी मंजूर करण्यात आला असून त्याची टेंडर प्रसिद्धी 30 मे 2022 ला मिळाली आहे. कार्यारंभ आदेश 7 फेब्रुवारी 2023 रोजी झाला आहे. ह्या नवीन उपकेंद्राचा ताहाराबाद वीज उपकेंद्राचा भारची विभागणी करून त्याचा फायदा ताहाराबाद, म्हैसगाव, चिखलठाण, कोळेवाडी, वाबळेवाडी या गावांना होणार आहे.

तालुक्यातील वांजुळपोई येथील नवीन 5 एमव्हीए क्षमतेचे वीज उपकेंद्र 4 कोटी रुपये खर्चास तत्कालीन पालकमंत्री ह्यांनी 12 एप्रिल 2021 रोजी मंजुरी दिली असून त्याचे टेंडर निविदा 7 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यारंभ 6 फेब्रुवारी 2023 रोजी मिळाला आहे. या उपकेंद्राचा पाथरे वीज उपकेंद्रावरील भार कमी करून तिळापूर वांजुळपोई, मालुंजे, मांजरी, खुडसरगाव, शेणवडगाव, महाडूक सेंटर, पाथरे, कोपरे या गावांना फायदा होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे नवीन 5 एमव्हीए क्षमतेचे 4कोटी 60 लाख रुपये खर्चास तत्कालीन पालकमंत्री ह्यांनी 25 जानेवारी 2022 रोजी मंजुरी दिली असून त्याचे टेंडर प्रसिद्धी 30 मे 2022 रोजी होऊन कार्यारंभ 7 फेब्रुवारी 2023 रोजी मिळाली आहे. ह्याचा फायदा मिरी वीज उपकेंद्राचा भारची विभागणी करून कोल्हार, शिराळ, चिंचोडी, डमाळवाडी, भोसे, दगडवाडी, मिरी, केशव शिंगवे, कामत शिंगवे, रेणुकाई वाडी, रुपेवाडी, शंकरवाडी, लोहसर, मोहोज, आडगाव, धारवाडी या गावांना होणार आहे.

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे 5 एमव्हीए क्षमतेचे कोटी 25 लाखाचे नवीन वीज उपकेंद्र तत्कालीन पालकमंत्री ह्यांनी 12 एप्रिल 2021 रोजी मंजुरी देऊन त्याची टेंडर निविदा 30 मे 2022 रोजी होऊन त्याची कार्यारंभ 7 फेब्रुवारी 2023 रोजी प्राप्त झाला आहे. या वीज उपकेंद्राचा फायदा जेऊर वीज उवकेंद्राचा भारची विभागणी करून डोंगरगण, मांजरसुंबा, पिपंळगाव माळवी, जेऊर, धनगरवाडी, इमामपूर, बहिरवाडी, तोडमलवाडी, चाफेवाडी, खोसपुरी, ससेवाडी, उदरमल, पांगरमल, मजले चिंचोली, या गावांना फायदा होणार आहे.

ताहाराबाद येथील वीज उवकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी 85लाख रुपये खर्चास तत्कालीन पालकमंत्री ह्यांनी 5 मे 2022 रोजी मंजुरी देऊन त्याची टेंडर निविदा 30 मे 2022 रोजी होऊन त्याचा कार्यारंभ 7 फेब्रुवारी 2023 रोजी मिळाला आहे. या सर्व वीज उपकेंद्राच्या मान्यतेसाठी पाठपुरावा माझ्या पद्धतीने केला.

या व्यतिरिक्त जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याने अळकुटे येथील वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात आली तर पुणेवाडी येथे नवीन वीज उपकेंद्र मंजूर केले. तर कोपरगाव, राहाता, नेवासा शेवगाव मतदार संघात नवीन वीज उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे. शीगोंदा तालुक्यातील चिखली येथे राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर होऊन त्या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा निघाली आहे. या सर्व कामांच्या मंजुर्‍या व निविदा प्रक्रिया महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच झाल्या होत्या. भाजप सरकारमध्ये फक्त कार्यारंभ आदेश देणे बाकी होते. ती प्रक्रिया आपण स्वतः अधिकार्‍यांशी प्रचंड पाठपुरावा करुन पूर्ण करुन घेतली.

महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या मुख्यमंत्री सौर योजनेत बदल करून त्यात सुधारणा करून व कल्पकता वापरून हा सौर ऊर्जा प्रकल्प मतदार संघातील बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी, शिराळ, येथे राबविण्याचा निर्णय घेऊन ती कामे प्रगती पथावर आहे. येथे स्थानिक पातळीवर निर्माण झालेले अडथळे स्थानिक पातळीवर सोडवून मार्गी लावले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री असताना विजेच्या समस्या सोडविण्यासाठी ठॄडड स्कीम अंतर्गत संपूर्ण राज्याचा विकास आराखडा तयार केला होता. यात नगर जिल्ह्याचा आराखडा आपण स्वतः लक्ष घालून तयार करवून घेतला. तोच आराखडा विद्यमान सरकारने आहे तसाच स्वीकारला असल्याचे आमदार तनपुरे ह्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पुढील काळात जिल्ह्यातील विजेच्या समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com