एक हजारहून अधिक करोनामुक्त
सार्वमत

एक हजारहून अधिक करोनामुक्त

रविवारी आणखी 105 जणांची करोनावर मात

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात रविवारी (19 जुलै) 105 रुग्णांनी करोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 25 इतकी झाली आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांत जिल्ह्यात ज्या वेगाने करोना संसर्गाचा फैलाव झाला त्याच वेगाने करोना मुक्त झालेल्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 38 रुग्ण करोनाच्या लढाईत हरले असून मृत्यूने त्यांना कवटाळले आहे.

रविवारी करोनामुक्त झालेल्यामध्ये नगर ग्रामीण 3, नगर शहर 38, नेवासा 3,पारनेर 10, राहाता 8, पाथर्डी 6, भिंगार 6, राहुरी 1, संगमनेर 6, श्रीगोंदा 2 आणि श्रीरामपूर येथील 22 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या रविवार (दि.12) पासून 459 रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. यात गेल्या रविवारी 66, सोमवारी 15, मंगळवारी 17, बुधवार 62, गुरूवारी 46, शुक्रवारी 22, शनिवारी 126 आणि काल रविवारी 105 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातून करोनामुक्त झालेल्याची संख्या 1 हजार 25 झाली आहे.

नगर शहरातील श्रमिकनगर परिसरातील वाढलेला करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 1 ऑगस्टपर्यंत हा परिसर सील करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे. श्रमिकनगरमधील पाईपलाईन रोडकडून श्रमिकनगरमध्ये येणारा मुख्य रस्ता, पाईपलाईन रोडवरील वॉशिंग सेंटर यासोबतच लगतचा पूर्वेकडील रेणावीकर कॉलनी, प्रतिमा कॉलनी, जय बजरंग विद्यालय, दक्षिणेस खुली जागा व सपकाळ हॉस्पिटल रस्ता, पश्चिमेस श्रेयस कॉलनी, चिंतामणी कॉलनी, हेरंब कॉलनी, चिंतामणी कॉलनी, कुष्ठधाम रोडवरील श्रमिक बालाजी चौक, भिस्तबाग चौक, उत्तरेकडील प्रशांतनगर, पेट्रोलपंप व परिसर, मनोज भंडारी दुकान ते जगदंबा क्लॉथपर्यंतचा परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com