अहमदनगर : पहिल्याच्या दिवशी 3 हजार 237 मोफत शिवथाळीचे वितरण

करोना संचारबंदी : 640 व्यक्तींकडून 2 लाख 33 हजारांचा दंड वसूल
 अहमदनगर  : पहिल्याच्या दिवशी 3 हजार 237 मोफत शिवथाळीचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी) - ‘ब्रेक दि चेन’ चे निर्बंध कडक करताना राज्य सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून, शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का अशी शंका असतानाच जिल्ह्यात पहिल्याच शिवभोजनच्या 3 हजार 237 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, संचार बंदीच्या पहिल्या दिवशी नियम मोडणार्‍या विरोधात पोलीस प्रशासनाने दंडासह अन्य कारवाईला सुरूवात केली आहे. यात पारनेर तालुक्यात एका कराटे क्लास चालकांसह पालकांना 25 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. तर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून 640 लोकांवर कारवाई करत दोन लाख 2 लाख 33 हजार 215 रुपयांचा दंड वसूल केला. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या सरकारने गरीबांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची ही योजना सुरू केली आहे. मागील लॉकडाउनच्या काळात ती पाच रुपयांना करण्यात आली. आतापर्यंत ती पाच रुपयांना देण्यात येत होती. मात्र, नव्याने निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून ही थाळी मोफत केली आहे. कडक निर्बंधाच्या काळात कोणी उपाशी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संचार बंदीचा काल गुरूवारी पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 29 केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन अशी आहे. वेगवेगळ्या भागातील केंद्रांना वेगवेगळी क्षमता ठरवून देण्यात आलेली आहे. निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी लवकरच संपल्या. असे असले तरी जिल्हा पुरवठा विभागाला नगर शहरातील 10 आणि उर्वरित जिल्ह्यातील 19 अशा 29 केंद्रासाठी 800 थाळ्यांचे वाढीव लक्षांक मंजूर असून त्यातून गरज भासल्यास शिवभोजनच्या थाळ्या वाढविण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com