जिल्ह्यात 82 पॉझिटिव्ह, चार मृत्यूंची वाढ

करोना विळखा आणखी घट्ट : बाधितांचा आकडा 1156
जिल्ह्यात 82 पॉझिटिव्ह, चार मृत्यूंची वाढ
करोना

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून येणार्‍या प्रत्येक दिवशी बाधित आढळणार्‍यांची संख्या वाढताना दिसत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्हा रुग्णालयातील प्रयोग शाळेतून 41 तर खासगी प्रयोग शाळेतून 29 असे 70 करोनाचे नवीन रुग्ण समोर आले आहेत.

यासह जिल्ह्यातील मृताच्या सरकारी आकडेवारीत चारने वाढ झाली असून आतापर्यंत 30 रुग्णांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, दिवसभरात संगमनेर तालुक्यात 31, नगर शहर आणि अकोले तालुक्यात प्रत्येकी 5 रुग्ण आढळून आले आहेत. यासह 200 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 156 झाला आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालय येथील करोना टेस्ट लॅबमध्ये बुधवारी 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 29 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यातील संगमनेर तालुक्यात निमोन 3, कासार दुमाला 2, गुंजाळ वाडी 2, माहुली 8, साकुर 1, तळेगाव दिघे 1, वडगाव 1, संगमनेर शहरातील 13 व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. तर अकोले तालुक्यात देवठाण 1, उंचाखडक 1, चास 3 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर नगर महापालिका क्षेत्रात 5 जण बाधित आढळून आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर मनपा 1, राहाता 1 आणि संगमनेर तालुक्यातील 5 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची 367 इतकी झाली आहे. तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 727 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. यासह बुधवारच्या मृताच्या आकडेवारीत करोना पोर्टलवर चार मृत्यूची वाढ झाली असून ते नेमके कधीचे याचा तपाशील सध्या नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंंबीकर यांनी स्पष्ट केले.

सारांश

उपचार सुरू असलेले रुग्ण : 367

बरे झालेले रुग्ण : 727

मृत्यू : 30

एकूण रुग्ण संख्या :1 हजार 124

जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍याला करोनाची बाधा झाली आहे. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. बाधित कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून घरी होता. तरी देखील त्याच्या संपर्कातील व्यक्तींंचे स्त्राव नमुने घेण्यात येणार आहे.

बुधवारी जिल्ह्यातील 62 रुग्णांनी करोनावर मात केली. यात अकोले 7, नगर ग्रामीण 8,मनपा 14, नेवासा 1, पारनेर 4 राहाता 2,संगमनेर 15, शेवगाव 6,श्रीगोंदा 2 आणि श्रीरामपूर येथील 03 रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 728 झाली आहे.

संगमनेरात एकाच दिवशी 31 करोना पॉझिटिव्ह

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

संगमनेर शहर व तालुक्यात करोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. आज एकाच दिवशी शहरातील 12 व तालुक्यातील 14 अशा 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री उशीरा आणखी 5 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात आतापर्यंत करोना बाधितांची संख्या 265 झाल्याने प्रशासनाने आक्रमक भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी पुन्हा कठोर लॉकडाऊनची गरज व्यक्त केली जात आहे

संगमनेरात सुरुवातीला ठराविक भागात आढळणारा हा आजार आता शहरातील सर्वच भागात व तालुक्यातील अनेक गावांत पसरत चालला आहे. आज आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा घातला आहे. एका दिवशी 26 जण करोना बाधित झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील नवघर गल्ली येथील 55 वर्षीय महिला, गणेशनगर गल्ली क्रमांक दोन मधील 27 वर्षीय युवक, गणेशनगर मधीलच 23 वर्षीय महिला,भारतनगर मधील 39 वर्षीय पुरुष (दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह) मालदाड रोड येथील 45 वर्षीय महिला,22 वर्षाचा युवक, मेनरोडवरील 43 वर्षीय महिला, 19 वर्षाची युवती, 25 वर्षांचा युवक एकता चौकातील 43 वर्षीय पुरुष,38 वर्षीय महिला शिवाजीनगर मधील 21 वर्षांचा तरुण यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

तालुक्यातील निमोण येथील 6 वर्षीय बालक,माऊली येथील 56 वर्षीय महिला,30 वर्षाचा पुरुष,26 वर्षीय पुरुष 7 वर्षीय बालिका, 5 वर्षे बालिका, 35 वर्षांचा पुरुष,12 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय बालक साकुर येथील 65 वर्षीय वृद्ध तळेगाव दिघे येथील 40 वर्षीय पुरुष, वडगाव पान 24 वर्षीय महिला,गुंजाळवाडी (गोल्डन सिटी) येथील 25 वर्षीय युवक,10 वर्षीय मुलगी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बाधितांपैकी दोघांचे अहवाल दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आले आहेत. करोना बाधितांची आकडेवारी पाहता तालुक्यात झपाट्याने बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनाचे संकट वाढत असताना नागरिकांची बेफिकीरी मात्र वाढताना दिसत आहे. प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना अंमलात न आणल्यास तालुक्यात करोनाचे संकट भयानक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com