'भावा दे रे मावा'

गुटखाविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी
'भावा दे रे मावा'

अहमदनगर (प्रतिनिधी)

गुटखाबंदी असतानाही नगर शहरातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा, सुगंधी मावा, तंबाखू आणि पानमसाल्यासह तत्सम पदार्थांची चढ्या भावाने राजरोस विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आरोग्यास घातक असल्याने गुटख्यासह स्वादिष्ट सुपारी, खर्रा किंवा मावा यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी नगर शहरात होत नसल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक पान टपऱ्यांवर गुटखा मिळतो. काही पानटपऱ्यांवर दोन वेगवेगळ्या पुड्यांतील पदार्थ एकत्र केल्यानंतर तयार होणारा 'मिक्स गुटखा' ही मिळतो. मावा किंवा गुटखा शरीरासाठी घातक आहे. तरीही मावा जास्तीत जास्त 'स्ट्राँग' करण्यासाठी त्यात अनेक पदार्थांची भेसळ केली जाते. ही भेसळ शरीराला अपायकारक ठरते. माव्यात निकृष्ट दर्जाचा चुना, सुपारीचाही वापर केला जातो.

काहीजण माव्यात रासायनिक द्रव्ये, वेदनाशमक बामचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुटखा, मावा व्यसनाच्या आहारी अनेकजण गेले आहेत. त्यांना या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी गुटखा बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, राजरोसपणे मिळणाऱ्या या पदार्थांमुळे सरकारच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. तंबाखू, मावा खाणाऱ्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. हा आजार झाल्यानंतर त्याचे खर्चिक उपचार अनेकांना पेलवतही नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने गुटखा विकणाऱ्यांना जरब बसण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

शाळकरी मुलंही...

तरुण, प्रौढांसह आता लहान मुलंही गुटख्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मोठ्यांचे अनुकरण करत काही शाळकरी मुलंही गुटखा, मावा खावू लागली आहेत. या व्यसनाचे शाळकरी मुलांमध्ये वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com