महसूल इमारतीचे लोकार्पण उरकले...

राष्ट्रवादीच्या नेत्यांची कार्यक्रमाकडे पाठ
महसूल इमारतीचे लोकार्पण उरकले...

अहमदनगर | Ahmednagar

मुख्यमंत्री येणार म्हणून अनेक दिवस रखडलेले नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण अखेर घाईगर्दीत उरकण्यात आले आहे. या समारंभाकडे राष्ट्रवादीच्या (NCP) मातब्बर नेत्यांसह आमदारांनी पाठ फिरविल्याने त्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. महसूल प्रशासनाकडून याबाबत काही राजकारण (Politics) केले गेले की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, ही नूतन वास्तू सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी उपयोगी ठरो, असा आशावाद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण बुधवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे ऑनलाईन उपस्थित असल्याचे सांगीतले गेले. मात्र त्यांनी रेकॉर्डेड संदेश पाठवून देत नागरिकांना हेलपाटे मारायची वेळ येवू देवू नका, असे अधिकार्‍यांना बजावले.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 2 मंत्री व 6 आमदार असताना एकानेही हजेरी न लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामागे काही राजकारण तर शिजले नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडून जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले (Rajashree Ghule) या एकमेव राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी होत्या. तर भाजपकडूनही आ.बबनराव पाचपते वगळता कोणताही नेता कार्यक्रमाला आला नाही. नेत्यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आले की त्यांनी येणे टाळले, यावरून पडदा उघडणे बाकी आहे.

दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी इमारत लोकार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि लोकप्रतिनिधी यांचे जिव्हाळ्याचे संबंध असतात. याचा अनुभव मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून आला आहे. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय इमारत चांगली असावी, असे पहिल्यापासून वाटत होते. म्हणून महसूलमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला आणि जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीला निधी दिला. चांगला प्लॅन तयार केला. राज्यात सर्वात सुंदर इमारत नगर जिल्ह्यात उभी राहिली आहे, याचा अभिमान आहे.

सुंदर इमारतीचे पावित्र्य राखले पाहिजे, संगमनेर मध्ये प्रशासकीय इमारत चांगल्या बांधल्या; पण कोपरे खराब झालेच, अशी खंत व्यक्त करत, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीची स्वच्छता ठेवा, त्याची राखण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांची असल्याचं त्यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसाला चांगली सेवा देण्याचे काम येथून झाले पाहिजे. अधिकार्‍यांकडून तसे होईल, याची खात्री असल्याचे मंत्री थोरात म्हणाले.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ.सुधीर तांबे, लहू कानडे, बबनराव पाचपुते, महापौर रोहिणी शेंडगे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते.

भाजप काळात काम बंद

मधल्या पाच वर्षांत इमारतीचे काम बंद होते. त्या काळात ताण झाला. पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महसूलमंत्री झालो आणि पहिल्या आठ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 20 कोटी मंजूर केले. या इमारतीमध्ये प्रत्येक गोष्ट गुणवत्तापूर्ण करण्यासाठी भर दिला, वेळोवेळी भेट देवून लक्ष घातले, असे महसूलमंत्री थोरात यांनी सांगीतले.

योगायोगाचे दुसरे नाव...

राज्यात आदर्श व सुंदर जिल्हाधिकारी कार्यालय नगर जिल्ह्यात उभे राहिले. याची पायाभरणी ना. थोरात यांनी केली व उद्घाटन त्यांच्याच हस्ते होत आहे. हा योगायोग आहे. योगायोगाचे दुसरे नाव ना.थोरात आहे. त्यांचा कोणत्या कामात अट्टाहास नसतो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले तर मला देखील चांगले काम करता येईल, असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले. मृद व जलसंधारण कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पालकमंत्र्यांच्या कानपिचक्या

ऑनलाईन संदेश पाठवून प्रत्यक्ष कार्यक्रमास येणे टाळणार्‍या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकार्‍यांना कानपिचक्या देत इमारतीच्या स्वच्छता आणि देखभालीबद्दल शंका उपस्थित केली. ते म्हणाले, शासकीय इमारतीचे विद्रूपीकरण होते. ते रोखले पाहिजे. शासकीय इमारतीतील लिफ्ट कधीच व्यवस्थित नसते, असा अनुभव आहे. त्यामुळे इमारत देखभाल व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्या. प्रश्न सोडवणारे हे कार्यालय आहे त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारायची वेळ येवू देवू नका, असे त्यांनी अधिकार्‍यांना बजावले.

Related Stories

No stories found.