'डेथ मिस्ट्री' : MIDC हद्दीत आठ दिवसात दुसऱ्यांदा आढळला कुजलेला मृतदेह

'डेथ मिस्ट्री' : MIDC हद्दीत आठ दिवसात दुसऱ्यांदा आढळला कुजलेला मृतदेह

अहमदनगर (प्रतिनिधी)

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत वांबोरी फाटा परिसरात एका युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडलेल्या घटनेला आठ दिवस होत नाही तोच पुन्हा इमामपूर (ता. नगर) घाटात एका 45 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली.

मागील शनिवारी (दि. 7 जानेवारी) शेंडी (ता. नगर) शिवारातील वांबोरी फाटा परिसरात एका अनोळखी युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या युवकाची ओळख अद्याप पटली नाही. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला असल्याची माहिती पोलिसाच्या तपासातून समोर आली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या युवकाची ओळख पटवून त्याचे खूनी शोधण्याचे काम एलसीबीसह एमआयडीसी पोलिसांकडून सुरू असतानाच गुरूवारी (दि. 12 जानेवारी) रात्री आठ वाजेच्या सुमारास इमामपूर घाटात शेडच्या कडेला खड्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी 45 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे.

माहिती मिळताच सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हा पुरूष कोण? त्याची ओळख पटवून त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com