दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड, सव्वा सहा लाखांच्या दुचाकी हस्तगत

तोफखाना पोलिसांची कामगिरी
दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड, सव्वा सहा लाखांच्या दुचाकी हस्तगत

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर शहर, उपनगरातून दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी तोफखाना पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यात तिघांचा समावेश असून त्यांच्याकडून सहा लाख 15 हजार रूपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

करण मनोज पवार (वय 22 रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी, नगर), उमेश दिलीप गायकवाड (वय 19 रा. नाना चौक, ढवणवस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) व मनोज गोरख मांजरे (वय 22 रा. कल्याण रस्ता, शिवाजीनगर, नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी देखील अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा दुचाकी चोरीचा उद्योग सुरू केला होता.

नगर शहर, उपनगरात दररोज दुचाकी चोरीला जात आहेत. तोफखाना हद्दीतील चोरीच्या दुचाकीचा तपास करण्याचे काम गुन्हे शोध पथकाकडून सुरू असताना त्यांना माहिती मिळाली की करण पवार, उमेश गायकवाड व मनोज मांजरे हे दुचाकी चोरून त्याची विक्री करत आहे. पथकाने त्या तिघांचा शोध घेतला असता ते मिळून आले. त्यांनी नगर शहर, उपनगरातून सात दुचाकी चोरी गेल्याची कबूली दिली. त्यातील दोन दुचाकीची विक्री केली होती. त्या पोलिसांनी हस्तगत केल्या तर पाच दुचाकी चोरट्यांच्या ताब्यात मिळून आल्या आहेत. एकुण सात दुचाकी हस्तगत केल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, दिनेश मोरे, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सुरज वाबळे, भानुदास खेडकर, सचिन जगताप, सतिष त्रिभुवन, सतीष भवर, संदिप गिर्‍हे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सुमीत गवळी, गौतम सातपुते, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास अंमलदार धामणे करत आहेत.

संशयित आरोपींना तोफखाना पोलिसांनी यापूर्वीही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून अनेक दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली होती. काही दिवस कारागृहात काढल्यानंतर ते पुन्हा जामिनावर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा दुचाकींची चोरी करण्यास सुरूवात केली. चोरलेली दुचाकी ओळखींच्या लोकांना कमी किंमतीत द्यायची व काही दिवसांत कागदपत्रे देतो असे सांगून ते गायब होत होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com