
अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील मंदिरात चोरी करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गणपत कुंडलिक केदार (वय 46 रा. हातराळ, सैदापूर, ता. पाथर्डी), अजय छबू चव्हाण (वय 27), जॅकसन उर्फ किशोर पुंजाराम जाधव (वय 34, दोन्ही रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी) यांना अटक करण्यात आली आहे.
अमरापूर (ता. शेवगाव) येथील रेणुकामाता मंदिराचे कुलूप तोडून 16 लाख 76 हजार 400 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी तुषार विजय वैद्य यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यासह जिल्ह्यातील इतर मंदीर चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, संतोष लोढे, सचिन अडबल, विजय ठोंबरे, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत व अरुण मोरे यांचे पथक करत होते. तपासादरम्यान गणपत केदार याने अमरापूर मंदिरात चोरी केल्याचे समजले. पोलिसांनी सुरूवातीला त्याला व नंतर त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. तिघांना अटक करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
दागिने शेतात पुरले
अटक केलेल्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी मंदिरातून चोरलेले दागिने एका शेतात पुरलेले असल्याचे सांगितले. सोन्या- चांदीचे दागिने काढून दिले असून पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने, दुचाकी व रोख रक्कम असा सात लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
22 गुन्ह्यांची कबुली
अटक केलेल्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी 22 गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेवगाव, तोफखाना, एमआयडीसी, नेवासा, श्रीरामपूर तालुका, पाथर्डी, भिंगार कॅम्प, श्रीरामपूर शहर, राजूर, शिर्डी, घारगाव, संगमनेर तालुका, एमआयडीसी या पोलीस ठाणे हद्दीतील 22 गुन्हे उघडकीस आले आहेत.