
अहमदनगर (प्रतिनिधी)
सी.आय.डी. पोलीस असल्याची बतावणी करून वृध्द महिलेचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडील दोन तोळे सोन्याच्या बागड्या दोघांनी चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 7) सकाळी पावणे नऊ वाजता सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात घडली.
शोभा राजकुमार कटारिया (वय 58 रा. साईशरण अपार्टमेंट, वैदुवाडी रस्ता, सावेडी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोमवारी सकाळी वॉकिंग करून घराकडे जात असताना त्यांना सोनानगर चौकात एक अनोळखी व्यक्ती भेटला. त्याने फिर्यादीला सी.आय.डी. पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्रही दाखवले. थोड्या वेळापूर्वी एका महिलेला चाकू मारून सोने चोरून नेले असल्याची घटना घडली आहे, असे सांगितले.
तेवढ्यात त्या अनोळखीचा साथीदारही त्याठिकाणी आला. त्यांनी फिर्यादीला हातातील सोन्याच्या बागड्या पाकिटामध्ये ठेवण्यास सांगितले. फिर्यादीकडे पाकिट नसल्याने सांगताच त्यांनी त्यांच्याकडील पिशवी दिली. फिर्यादीने हातातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बागड्या काढून पिशवीमध्ये टाकल्या. फिर्यादीच्या हातात पिशवी देऊन ते दोघे निघून गेले. फिर्यादीने पिशवी पाहिली असता त्यामध्ये बागड्या नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाली असल्याची माहिती त्यांनी पतीला दिली. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.