हेरंब कुलकर्णी मारहाण प्रकरण : पसार झालेले दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

हेरंब कुलकर्णी | Heramb Kulkarni
हेरंब कुलकर्णी | Heramb Kulkarni

अहमदनगर (प्रतिनिधी)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक व येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी (वय 52 रा. श्रमिकनगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास सावेडीतील प्रेमदान हाडको परिसरात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता.

हल्ला करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री पकडले होते. अक्षय विष्णू सब्बन (वय 30 रा. दातरंगे मळा), चैतन्य सुनील सुडके (वय 19 रा. बालिकाश्रम रस्ता) व एक अल्पवयीन मुलगा यांचा त्यामध्ये समावेश होता. दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

या गुन्ह्यात सहभाग असलेले दोघे पसार झाले होते. त्यांनाही तोफखाना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. सनी ज्ञानेश्वर जगधने (वय २४ रा. रंगभुवन, सर्जेपुरा) व अक्षय कैलास माळी (वय २० रा.घासगल्ली, कोठला) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत.

असा रचला कट

अक्षय सब्बन याची सुमारे 40 वर्षांपासून सीताराम सारडा विद्यालय परिसरात पानटपरी होती. हेरंब कुलकर्णी यांची जूलैमध्ये सीताराम सारडा विद्यालयात बदली झाली. त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार हाती घेताच विद्यालय परिसरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या अतिक्रमणातील टपर्‍या काढण्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. जूलैच्या शेवटी मनपाने त्या सर्व टपर्‍या हटविल्या. 40 वर्षांपासून असलेली टपरी काढल्याचा राग सब्बन याच्या मनात होता. त्याने त्याच्या टपरीवर नेहमी येणार्‍या सनी जगधनेकडे राग व्यक्त केला. कुलकर्णी यांना मारहाण करण्याचे बोलून दाखविले. जगधने तयार झाला. त्याने त्याच्या तीन पंटरांना सोबत घेतले. याचा पहिला प्रयत्न 20 सप्टेंबर रोजी झाला होता. कुलकर्णी विद्यालयात असताना सब्बन याने सांगितल्याप्रमाणे जगधनेचे पंटर कुलकर्णी यांना मारहाण करण्यासाठी आले होते; परंतू त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांनी शनिवारी दुपारी कुलकर्णी यांना रस्त्यात गाठून मारहाण केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com