
अहमदनगर (प्रतिनिधी)
माळीवाडा बसस्थानकाच्या सुलभ शौचालयातील कर्मचार्याला सत्तूरने मारहाण करून काऊंटरमधील सातशे रूपये बळजबरीने हिसकावले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अविनाश अशोक शेलार व आकाश सुंदर उबाळे (दोघे रा. भिंगार) यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुलभ शौचालयात काम करणारे कर्मचारी दीपककुमार राजेंद्र सिंह (वय 40 हल्ली. रा. माळीवाडा बसस्थानक, मूळ रा. बेन्नीपटटी, जि. वैशाली, राज्य बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग हे सुलभ इंटरनॅशनल कंपनीच्या माळीवाडा बसस्थानक येथील शाखेत सुमारे चार वर्षापासून नोकरी करतात. सहकारी पप्पू मिश्रा व सिंह असे दोघे येथे ड्युटी करतात. बुधवारी (दि. 5) रात्री दोघेजण ड्युटीवर असताना अकराच्या सुमारास मिश्रा हा झोपण्याकरिता रूमवर गेला. यावेळी सिंह हे देखरेखीचे काम करीत असताना दोघेजण तेथे आले व पैशांची मागणी करू लागले. त्यास नकार दिल्याचा राग येऊन त्यातील एकाने कमरेला लावलेला लोखंडी सत्तूर काढून सिंह यांच्या मानेवर वार केला. हात मध्ये आणल्याने त्यांच्या बोटांना दुखापत झाली. यावेळी शिवीगाळ करून तू आम्हांला ओळखत नाही. आम्ही या एरियाचे दादा लोक आहेत, असे म्हणून त्यातील एकाने काऊंटरमधील सातशे रूपये बळजबरीने काढून घेतले व जाताना दोघांनी आमच्या नादी लागला तर तुम्हाला येथे सुलभ शौचालय चालू देणार नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सिंह हे आरडाओरड करत माळीवाडा बसस्थानकातील पोलीस चौकीजवळ पळत गेले, त्यावेळी दोघेजण पाठीमागे हातात सत्तूर घेऊन पळत आले. त्यावेळी बसस्थानक परिसरातील लोकांनी त्या दोघांना पकडले. गस्तीवरील पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.