
अहमदनगर (प्रतिनिधी)
घरगुती काम करता येत नाही म्हणून विवाहितेचा सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती शामराव दत्तात्रय खांदवे, सासरा दत्तात्रय विठोबा खांदवे, सासू मिराबाई दत्तात्रय खांदवे (सर्व रा. शिंदे मळा, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा विवाह शामराव खांदवेसोबत 20 फेब्रुवारी, 2018 रोजी झाला होता. विवाहनंतर फिर्यादी यांना सासरच्यांनी चार महिने व्यवस्थित नांदवले. त्यानंतर पती, सासू-सासरे नेहमी घरगुती छोट्या मोठ्या कारणावरून, घरगुती काम येत नाही, स्वयंपाक करता येत नाही म्हणून शिवीगाळ करून त्रास देत होते.
त्यानंतर पती व फिर्यादी हे वेगळे राहण्यासाठी भूषणनगर, केडगाव येथे गेले. तेथेही फिर्यादीला पतीकडून त्रास दिला जात होता. यामुळे फिर्यादी 11 ऑगस्ट, 2022 रोजी माहेरी निघून आल्या होत्या. त्यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. तेथे पती-पत्नीमध्ये समझोता न झाल्याने फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या पतीसह सासू-सासर्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.