
अहमदनगर (प्रतिनिधी)
यवतमाळ जिल्ह्यात कोयता व चाकूने मारहाण करून दोघांचा खून करणारे सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील वांबोरी फाटा (ता. नगर) शिवारा सापळा रचून सहा संशयितांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी पुसद शहर पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे.
पवन बाजीराव वाळके (वय 23), नीलेश दीपक थोरात (वय 24), गोपाल शंकर कापसे (वय 26), गणेश संतोष तोरकड (वय 21), गणेश शंकर कापसे (वय 24), अवि अंकुश चव्हाण (वय 22, सर्व रा. विटाळवाडी, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी पवन वाळके हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरूध्द यवतमाळ जिल्ह्यात जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे असे सात गुन्हे दाखल आहेत. तर नीलेश थोरात, गोपाल कापसे या दोघांविरूध्द तीन गंभीर गुन्हे आहेत.
नयन अनिल केवटे (रा. हनुमंतबाबा मंदिराजवळ, विटाळवार्ड, ता. पुसद, जि.यवतमाळ) यांचे कुटुंबिंयाना पवन वाळके व त्याचे इतर साथीदारांनी किरकोळ वादावरून कोयता व चाकूने मारहाण केली. त्यात राहुल हरिदास केवटे व क्रिश विलास केवटे यांना जीवे ठार मारले. याबाबत पुसज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील संशयित हे मालवाहू टेम्पो मधून छत्रपती संभाजीनगर मार्गे अहमदनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती पुसद पोलिसांना खबर्याने दिली. यवतमाळचे पोलीस अधीक्षक यांनी नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्यानुसार ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना संशयित अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वांबोरी फाट्याजवळ सहा संशयितांना ताब्यात घेत अटक करण्यात आले.