
अहमदनगर (प्रतिनिधी)
सावेडी उपनगरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्या श्रीरामपूर, कोपरगावच्या दोघा सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून चोरीचे एक लाख चार हजार रूपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
विकास गोंडाजी चव्हाण (वय 28 रा. अशोकनगर ता. श्रीरामपूर), कपील राजू पिंपळे (वय 35 रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. अर्पणा महेश कोडम (रा. आनंदीबाजार) व त्याचे पती सावेडीतील कुष्ठधाम रोडने जात असताना पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या चोरट्याने अर्पणा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबडले होते. याप्रकरणी अर्पणा यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सावेडी उपनगरासह जिल्ह्यात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या.
निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, पोलीस हवालदार विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, रविकिरण सोनटक्के, पोलीस शिपाई रणजित जाधव, विजय धनेधर, चालक पोलीस हवालदार संभाजी कोतकर यांचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाने खबर्यामार्फत सोनसाखळी चोरी करणार्यांची माहिती काढली.
विकास गोंडाजी चव्हाण याने त्याचे साथीदारासह नगरमधील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरी केले असून तो हरेगाव फाटा येथे येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. एलसीबीच्या पथकाने हरेगाव फाटा येथे सापळा लावला. काही वेळाने एक इसम पायी येताना दिसला. सापळा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्याचा संशय आल्याने त्यास अचानक घेराव घालून पकडले. त्याने त्याचे नाव विकास गोंडाजी चव्हाण असे असल्याचे सांगितले. त्याने त्याचे साथिदारसह नगर शहरात महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरी केल्याचे कबुली देऊन सदरचे चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्याचा साथीदार कपील राजू पिंपळे (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) याच्याकडे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पिंपळे याला पकडण्यासाठी नगर-कोपरगाव रोड, पुणतांबा फाटा येथे सापळा लावला असता पुणतांबा फाटा या ठिकाणी विकास गोंडाजी चव्हाण याने त्याचा साथीदार पिंपळे याला दाखविला असता त्यास ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात दोन तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र मिळुन आले. दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी नगर शहरात कुष्ठधाम रोड व पाईपलाइन रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबुली दिली. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहे.
निरीक्षक कटके यांचे मार्गदर्शन
जिल्ह्यात चोर्या, घरफोड्या, दरोडे, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाढते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक कटके यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या सर्व अंमलदारांची बैठक घेऊन गुन्हे उघडकीस आण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. उपनिरीक्षक गोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खबर्यांच्या मदतीने सोनसाखळी चोरट्यांची माहिती काढून दोघांना गजाआड केले आहे. निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून गुन्हेगारांचा शोध सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येणार असल्याचे समजते.
‘त्याला’ पकडण्यासाठी महिलांचा विरोध
एलसीबी पथकाने सुरूवातीला विकास चव्हाण याला गजाआड केल्याने त्याने साथीदार कपील पिंपळे याच्या मदतीने नगर शहरात महिलांचे दागिने चोरले असल्याची कबूली दिली. चव्हाणच्या मदतीने पोलीस पिंपळेजवळ पोहचले. दरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच पिंपळे पसार झाला. पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला असता पिंपळेच्या नातेवाईक महिलांनी पोलिसांना विरोध केला. पोलिसांनी त्यांचा विरोध पत्करून पिंपळेला पकडले.