धक्कादायक! गुटखा दिला नाही म्हणून मजुराचा खून

नगर तालुक्यातील घटना; खून करणारा अटकेत
धक्कादायक! गुटखा दिला नाही म्हणून मजुराचा खून

अहमदनगर (प्रतिनिधी)

गुटखा दिला नाही म्हणून दोन परप्रांतीय मजुरांमध्ये वाद झाले. या वादातून एकाने दुसर्‍याचा लाकडी काठी डोक्यात घालून खून केल्याची घटना गुरूवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास अरणगाव (ता. नगर) शिवारात घडली. अजय रामरूम चौधरी (वय 22 रा. मटीयार, ता. भुतहवा, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. अरणगाव) असे खून झालेल्या परप्रांतीय मजुराचे नाव आहे.

याप्रकरणी शुक्रवारी (दि. 13) रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजनारायण अर्जुन तांते (वय 24 रा. मथायदिरा, ता. खगाडिया, बिहार, हल्ली रा. जी.एच.व्ही.कंपनी अरणगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या परप्रांतीय मजुराचे नाव आहे. याप्रकरणी शैलेंद्र सुरेश यादव (वय 32 रा. जमुरिया खुर्द ता. मेघावल, जि. संतकबीरनगर, उत्तर प्रदेश, हल्ली रा. जी.एच.व्ही.कंपनी अरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

अजय चौधरी, तेजनारायण तांते, शैलेंद्र यादव हे सर्व जण अरणगाव शिवारातील जी.एच.व्ही.कंपनीत कामाला आहेत. गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास तेजनारायण तांते याने अजय चौधरी याच्याकडे खाण्यासाठी गुटखा मागितला. अजय याने गुटखा दिला नाही म्हणून तेजनारायण याने शिवीगाळ करत लाकडी काठी डोक्यात घालून गंभीर जखमी केले. जखमी अजय याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. मारहाण करणारा तेजनारायण तांते याच्या विरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com