
अहमदनगर (प्रतिनिधी)
कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरातील जिल्हा परीषद शाळेच्या भिंतिच्या आडोशाला सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 50 हजार रूपये किंमतीच्या तीन गोवंशीय जनावरांची सुटका केली. गुरूवार (दि. 31) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल गाडे यांच्या फिर्यादीवरून फैजान इंद्रीस कुरेशी (पत्ता माहिती नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजान इंद्रीस कुरेशी याने झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यात गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना कारवाई करण्याबाबत सूचना केली. पथकाने दुपारी अडीचच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता 50 हजार रूपये किंमतीचे तीन गोवंशीय जनावरे डांबून ठेवले मिळून आले. पोलिसांनी त्या जनावरांची सुटका केली असून कुरेशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार बनकर अधिक तपास करीत आहेत.