
अहमदनगर (प्रतिनिधी)
घरगुती गॅस टाक्यांच्या बेकायदेशीर साठा करून त्या गॅस टाक्यांमधून रिक्षामध्ये गॅस भरताना युवकाला पकडण्यात आले. सनी दत्ता शिंदे (वय 20 रा. वैदुवाडी, सावेडी) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे.
शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या पथकाने शनिवारी दुपारी सावेडीत ही कारवाई केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रोफेसर चौक ते विस्तवात चौक रस्त्यावर हॉटेल जगदंबाच्या पाठीमागे भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्या जवळ बाळगून त्या गॅस टाकीतून गॅस काढुन तो युसुफ नजीर पठाण (वय 55 रा. भातोडी ता. नगर) यांच्या रिक्षामध्ये (एमएच 16 सीई 1659) भारत असताना पोलिसांनी छापा टाकला.
कारवाईत गॅस रिफिलिंग मशीन, मोटार, रिप्लग सर्किट, डिजीटल वजन काटा, रिक्षा, 31 गॅस टाक्या असा तीन लाख 86 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उपअधीक्षक कातकाडे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार तनवीर शेख, हेमंत खंडागळे, सुयोग सुपेकर व सागर व्दारके यांनी ही कारवाई केली.