
पारनेर (तालुका प्रतिनिधी)
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे जुन्या वादातून एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालुन खुन करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.२२) रात्री घडली असून याप्रकरणी सुपा पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. संतोष बबन गायकवाड (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गायकवाड परिवार व दरेकर परिवार यांच्यात काही दिवसपुर्वीच मोठा वाद झाला होता. गुरुवारी रात्री १० वाजता पुन्हा या वादाला तोंड फुटले. यात तीन जणांनी गायकवाड यास कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालुन ठार केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य पाहून सुपा पोलिसांनी तात्काळ माहिती गोळा करत घटनेतील तीनही आरोपींना रात्रीच अटक केली असुन प्राथमिक माहितीनुसार तीनही आरोपी अल्पवयीन आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी पुढील तपास करत आहेत.