अहमदनगर (प्रतिनिधी)
पदुचेरी येथील कांदा व्यापार्याने येथील कांदा व्यापार्याकडून 25 हजार 640 किलो कांदा खरेदी करून त्याचे तीन लाख 84 हजार 600 रूपये न देता फसवणुक केली आहे. या प्रकरणी येथील कांदा व्यापारी रियाज आलम शेख (वय 34 रा. ताठेमळा, बालिकाश्रम रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पी.सेल्वकुमारन (रा. पदुचेरी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख यांचा आयेशा ट्रेडर्स नावाने कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी पी.सेल्वकुमारन याला 2 जुलै, 2022 रोजी रात्री ट्रकमध्ये 25 हजार 640 किलो कांदा पाठविला होता. सदरचा कांदा 15 रूपये किलोप्रमाणे देण्यात आला होता. याचे एकुण तीन लाख 84 हजार 600 रूपये झाले होते. कांदा पाठविण्यापूर्वी 5 जुलै, 2022 रोजी पैसे खात्यावर टाकण्याचे आश्वासन पी.सेल्वकुमारन याने दिले होते. 4 जुलै, 2022 रोजी कांद्याचा ट्रक पोहच झाल्याचे पी.सेल्वकुमारन याने शेख यांना फोन करून सांगितले होते.
शेख यांनी ठरल्याप्रमाणे 5 जुलै, 2022 रोजी पैशासाठी पी.सेल्वकुमारनला फोन केला. शेख यांना पैसे मिळाले नाही. पी. सेल्वकुमारन याने कुरियरव्दारे साऊथ इंडिय बँकेचा चेक पाठविला होता. तो चेक पण वटला गेला नाही. शेख यांनी वारंवार पी. सेल्वकुमारन याला संपर्क साधून पैसे देण्याची विनंती केली. शेख हे पदुचेरी येथे त्याच्याकडे जावून आले. त्याने पैसे देणार असल्याचे सांगून पुन्हा येथे येऊ नका, नाहीतर खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली होती.
दरम्यान फसवणुक झाली असल्याचे शेख यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी 29 डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पी.सेल्वकुमारन याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.