
अहमदनगर (प्रतिनिधी)
पूर्ववैमनस्यातून युवकावर तलवार, कोयता, लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी (दि. 29) रात्री नऊ वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर घडली. मयुर बाळासाहेब सोमवंशी (वय 24 रा. गावडे मळा, पाईपलाइन रोड, सावेडी) असे जखमी युवकाचे नाव आहे.
त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून रोहन कुलंट, अजय करपे, महेश वैद्य, वैभव बारस्कर, सिध्देश तागड, ओम कसबे व इतर तीन ते चार अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 मे 2023 रोजी भिस्तबाग चौक येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात दोन मंडळात वाद झाले होते. या वादात मयुर सोमवंशी यांच्या मंडळातील भावेश कतुल यांना मारहाण केली होती. या प्रकरणी ओम कसबे व त्याच्या इतर साथीदारांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून दोन्ही मंडळात वारंवार वाद होत होते. गुरूवारी रात्री नऊ वाजता मयुर हे त्यांच्या मित्राची कार घेऊन पाईपलाइन रोडवरील एचडीएफसी बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे सहा ते सात दुचाकीवरून रोहन कुलंट, अजय करपे, महेश वैद्य, वैभव बारस्कर, सिध्देश तागड, ओम कजबे व इतर तीन ते चार अनोळखी हातात तलवार, कोयते, लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी मयुर यांना शिवीगाळ करत रोहन कुलंट याने त्याच्या कंबरेला लावलेला कट्टा मयुर यांच्या डोक्याला लावला. तसेच तलवार, कोयता व लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी मयुर घटनास्थळावरून पळाले असता त्यांच्या मित्राची कारची तोडफोड करण्यात आली. जखमी मयुर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही संयशीतांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.