पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

नगरजवळील घटना; श्रीरामपूरला होते कार्यरत
पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

अहमदनगर (प्रतिनिधी)

श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक असलेल्या शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा. जाधव पेट्रोल पंपाजवळ कल्याण रोड, नगर) यांच्या डोक्यात पिस्तुलातून गोळ्या घालून खुन केला. गुरूवारी मध्यरात्री केडगाव बायपास येथील हॉटेल के 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ ही घटना घडली आहे. तीन लुटारूंनी हा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याप्रकरणी मयत होले यांचे नातेवाईक अरूण नाथा शिंदे (वय 45 रा. नेप्ती ता. नगर) यांनी शुक्रवारी पहाटे कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास केडगाव शिवारातील केडगाव बायपास रोडवर हॉटेल के 9 जवळ एका बंद ढाब्याजवळ अरूण शिंदे व शिवाजी होले असे अंधारात दारू पित बसले होते. त्यादरम्यान केडगाव बायपास रोडकडुन दोन अनोळखी इसम हे तेथे पायी चालत आले व म्हणाले की, आम्ही येथे दारू पिऊ का? त्यानंतर शिंदे व होले त्यांना म्हणाले,‘आम्ही नेप्तीचे आहोत तुम्ही बिनधास्त बसुन दारू प्या’. त्यानंतर ते दोघे काही एक न बोलता केडगाव बायपास रस्त्याकडे जावुन पुन्हा त्याच रस्त्याच्या बाजुने त्यांच्यासोबत आणखी एक इसमाला घेऊन आले.

त्यातील एका इसमाच्या हातात चाकु व दुसर्‍या इसमाच्या हातात पिस्तूल होती. त्यातील एका इसमाने शिंदेंच्या गळ्याला चाकु लावुन,‘तुमचे खिशातील पैसे काढा’, असे म्हणाला. त्याचवेळी शिवाजी होले त्यांना म्हणाले की,‘तुम्ही आम्हाला नडता का’, असे म्हणुन ते रस्त्याकडे पळले. त्यानंतर त्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातात असलेले पिस्तूलने शिवाजी होले यांच्या दिशेने गोळी फायर केली. यात शिवाजी होले यांचा मृत्यू झाला. तसेच शिंदेंना खाली पाडुन मानेला चाकु लावुन बळजबरीने तीन हजार रूपये रोख रक्कम, मोबाईल काढून डोळ्यात मिर्ची पावडर फेकुन ते अनोळखी तीन इसम केडगाव बायपास रस्त्याचे दिशेने पळुन गेले.

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. सदर ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी येत आहे. एलसीबी पथकाकडून काही संशयीतांकडे यासंदर्भात चौकशी करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी चौकशीसाठी काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते. दरम्यान हा खुन लुटारूंनींच केला का? यामागे दुसरे काही कारण आहे, याची चर्चा नगर शहरात होत आहे. पोलीस अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com