विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल

अहमदनगर | प्रतिनिधी

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू सासऱ्याविरोधात येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील खरवंडीचे सोपान भोगे यांची मुलगी कोमल हिचा विवाह नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील रमेश बाळासाहेब जाधव याच्यासोबत झाला होता. पती रमेश, सासरा बाळासाहेब जाधव व सासू सुनीता जाधव यांनी पैशासाठी छळ केल्याने कोमलने आत्महत्या केल्याप्रकरणी सुरूवातीला पती, सासू सासऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

दोन दिवसांपूर्वी मयत कोमलचे वडिल सोपान भोगे, भाऊ अरूण भोगे, प्रभाकर भोगे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ करून कोमलला मारहाण केली व विहिरीत टाकून दिले, असा आरोप केला होता. तसे निवेदन अधीक्षक पाटील यांना दिले होते. अधीक्षक पाटील यांनी तात्काळ दखल घेत पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व सहायक निरीक्षक आठरे यांना दिले होते.

त्यानुसार रमेश जाधव, बाळासाहेब जाधव व सुनीता जाधव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी रमेश जाधव याला अटक केली असून अद्याप सासरा बाळासाहेब व सासू सुनीता यांना अटक केलेली नाही. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भोगे कुटुंबाने केली आहे.

Related Stories

No stories found.