
अहमदनगर (प्रतिनिधी)
प्रेमदान चौकात सुरू असलेल्या बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. रोकड, मोबाईल असा 29 हजार 120 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अंमलदार रवींद्र घुंगासे यांनी फिर्याद दिली आहे.
अन्वर राजु सय्यद (वय 21 रा. जिल्हा परीषद शाळेजवळ, बोल्हेगाव) व केतन गोयल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुरूवारी (दि. 19) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार घुंगासे, अतुल लोटके, रणजित जाधव, बाळासाहेब गुंजाळ यांचे पथक तोफखाना हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना प्रेमदान चौकात अन्वर राजु सय्यद हा मोबाईल आयडी व पासवर्ड वापरून बिंगो ऑनलाईन जुगार पैसे घेऊन खेळत व खेळवित आहे, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी पंचासमक्ष सदर ठिकाणी सुरू असलेल्या बिंगो जुगारावर छापा टाकून कारवाई केली. मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेतले असून एकुण दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.